Thursday, September 16, 2010

कर्टुल्याची भाजी

कर्टुल्याची भाजी

 वातानुकूलित मॉल्समधून भाज्या घेण्यापेक्षा भाजीबाजारातून भाजी घेण्याची मजाच वेगळीच आहे. वेगवेगळ्या भाज्यांबरोबरच भाजीवाल्यांशी होणारा संवादही भाजी घेतांनाची रंगत वाढवतो. श्रावण किंवा भाद्रपदात बाजारात चक्कर मारल्यास भरेकरी (मुळताहा भाजी व्यावसायिक नसलेले) रानभाज्या विकायला घेऊन बसलेले दिसतात. ’कर्टुलं’ ही त्यातलीच एक रानभाजी !! जव्हार रस्त्यावर फिरायला गेलो असता वेलीवरुन तोडलेली हिरवागार कर्टुली अजूनही लक्षात आहेत. ’कर्टुलं’ स्ट्रॉबेरीपेक्षा थोडेसे मोठे, मऊ काटे असलेले हिरवेगार असते. रानात उगवणारी असल्याने नेहमी उपलब्ध नसते तसेच असते तेव्हा ब-यापैकी महाग असते :)-  असो ही कर्टुल्याची भाजी तुम्ही पुढच्या मोसमात नक्कीच करुन बघाल.

साहित्य :

कर्टूली
दाण्याचा कूट
फोडणीचे साहित्य
कोथिंबीर
ओल्या नारळाचा चव

कृती :

कर्टूली
१) कर्टूली धुतांना त्याच्या काटयातून माती निघेल ह्याची काळजी घ्यावी. स्वच्छ पुसून काटयांसकट पातळ उभी चिरुन किंवा गोल चकत्या करुन घ्यावी.
२) कढईत पुरेसे तेल टाकून मोहरी तडतडली की हिंग, हळद टाकून चिरलेली कर्टूली घालून परतावी.
३) पाणी न घालता, गॅस मंद करुन, झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. कढईला लागत असल्यास मधून परतावी किंवा झाकणावर पाणी घालावे.
४) एक वाफ आली की त्यात तिखट, मीठ, गरम मसाला, धने-जिरे पावडर आणि दाण्याचा कूट घालून आणखी वाफेवर चांगली शिजू द्यावी.
५) शिजली की त्यावर आवडीनुसार कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून सजवावे.

टीप : ह्या भाजीमध्ये फारसा मसाला किंवा वाटण घालण्याचा अटटाहास करु नये कारण ही भाजी जितकी ’बेसीक’ तितकी तिची अस्सल चव कळते. लक्षात घ्या आपण जितका मसाला घातला आहे तितका मसालाही आदिवासी त्यात घालत नाहीत.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...