Wednesday, August 31, 2016

मनी गणेश वसावा

गेल्या आठ वर्षांपासून मी घरी शाडू मातीचा गणपती तयार करते आहे. कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता दरवर्षी चुकतमाकत हे शिकणे सुरुच आहे. पहिल्या वर्षी गणपती तयार करायला घेतला तेव्हा पर्यावरणाच्या हिताचाच विचार मनात होता. दोन्ही मुलांनाही त्यात सहभागी केले त्यामुळे प्रत्येक वर्षी गणेशमूर्ती तयार करणे हा आम्हा सर्वांसाठी सृजनात्मक अनुभव झाला. आईच संपूर्ण जवाबदारी घेते आहे म्हटल्यावर मुलांनी त्यांना इतर ’अधिक महत्त्वाची’ कामे आहेत असे सांगून अंग काढून घेतले. त्यामुळे आता प्रत्येक वर्षी गणरायाला घडवणे माझ्याकडे आले.

प्रत्येक वर्षी माती भिजवतांना माझ्या मनात उत्साहाबरोबरच धाकधूक असते. मातीला प्रथम वंदन करुनच भिजवायला घेते. अनेकांनी मला प्रश्न विचारलेत की तू एखादे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवतेस का ? सुरुवात कशी करतेस ? किती किलो माती लागते ? मूर्ती किती मोठी असावी हे कसे ठरवतेस ? दागिने, आसन वगैरे आधीच ठरवून ठेवतेस का ?... वगैरे वगैरे. आता खरंतर हे प्रश्न एखाद्या वाकबगार कलाकाराला किंवा मूर्तीकाराला विचारणे आणि त्याने उत्तर देणे ठिक आहे. मात्र माझ्या सारख्या हौशी कलाकाराला (?) हे विचारल्यावर माझे उत्तर असते, " मी काही ठरवून करत नाही" .

हो अगदी खरे आहे. स्त्रीला सृजनशील म्हटले आहे ते उगीच नाही. छोटा अंकूर जेव्हा स्त्रीच्या उदरात फुलतो तेव्हा तिला तरी त्याचे रंग-रुप कोठे माहित असते. नऊ महिने त्याची हालचाल जाणवते मात्र त्याचे रुप काही केल्या डोळयासमोर येत नाही. अगदी श्रीकृष्णाचा, बाबाचा, आजी-आजोबांचा चेहरा समोर आणला तरीही नाही. तिच्या पोटात वाढणारा तो एकमेव आणि अद्वितीय असतो/असते.


दरवर्षी भाद्रपद जवळ आला की मी माती कालवून ठेवते मात्र मनापासून करावेसे वाटत नाही तोपर्यंत गणपती तयार करायला घेत नाही. माती सारखी करतांना हळूहळू त्याचे रुप मनात साकारत जाते.

मातीचे गोळे एकमेकांवर ठेवल्यावर, त्यातून मूर्ती घडवतांना human anatomy डोळ्यासमोर येते, मात्र कलाकार म्हणून आपली मर्यादा जाणवत रहाते. मग सुरु होते तगमग ! कसे असायला हवे हे माहिती आहे मात्र साकारता येत नाही. बिघडण्या-घडण्याच्या ह्या अस्वस्थतेत आपल्या गणेश बाळाचे रुप साजिरे व्हावे ह्यासाठी ही धडपड असते. आता माझ्यातल्या कलाकारापेक्षा आई अधिक वरचढ झालेली असते. मला वाटते प्रत्येक कलाकार पालकत्वाच्या भूमिकेत नकळत असाच शिरत असावा. मूर्ती पूर्ण झाल्यावर, ’काही राहिले आहे का’ असे विचारल्यावर खरंतर कुणी काही चुका सांगाव्या असे अजिबात वाटत नसते. कारण शेवटी, आपले मूल जसे आहे तसेच आईला आवडते. मला ह्यावेळी हटकून पार्वतीची गोष्ट आठवते. तिनेही गणरायाला असेच आपल्या मळापासून घडवले आणि हत्तीचे तोंड बसवावे लागल्यावर मनापासून कवटाळले. असो, तर दरवर्षी ही भावना माझ्या मनात उचंबळून येते.




आता मूर्ती तयार झाली आहे. रंगवल्यावर माझ्या ह्या श्री गणेशाचे रुप आपल्या समोर येईलच. त्याबद्दल प्रतिक्रियाही येतील. मात्र मला सृजनाचा आनंद देणारा हा गणेश माझ्या मनी वसला आहे.



गणपती बाप्पा मोरया !!

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...