तर माझ्या ह्या मैत्रिणीचे घर अगदी पारंपारीक आहे. जेवणाच्या वेळा ठराविक. रोजचं जेवणही साग्रसंगीत दोन भाज्या, कोशिंबीर, वरण-भात आणि जेवायला बसल्यावर गरम फुलके. जेवण दोन्ही वेळेला ताजं आणि गरमच वाढल पाहिजे हा नियम. त्यामुळे स्वयंपाकाची वेळ झाली की माझ्या ह्या मैत्रिणीची घालमेल होते. असेल तिथून ती थेट घराकडे धाव घेते. मी कित्येकदा तिला समजावून सांगितले की अगं मग करुन येत जा नं. त्यावर हिचं लाडिक उत्तर की अगं नव-याला आणि मुलाला मीच वाढायला हवं असतं. स्वतःच्या हातानेच काय, सासूबाईंकडून सुध्दा वाढून घेत नाही. तिच्या ह्या कौतूकाच्या बोलण्यावर मी कपाळावर हात मारुन घेतला ( आणि मनात माझ्या नव-याला पाठीवर कौतुकाची थाप दिली. कारण आमच्याकडे बरोबर उलटी परीस्थिती, मी थांबायचं म्हटलं की नवरा आणि मुलं एकसुरात म्हणणार आम्ही मॅनेज करु गं, तू जा !) मात्र माझ्या इतक्या कर्तव्यदक्ष मैत्रिणीला मिसळसारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळू नये ह्याची फार खंत वाटली.
गेल्या आठवडयात ह्याच मैत्रिणीचा वाढदिवस झाला. आदल्या दिवशी मी तिला फोन केला की बरोबर आठ वाजता मी तूला घ्यायला येईन आणि मग आपण मिसळ खायला जाणार आहोत. ऐकल्यावर आनंदाने तिचा विश्वासच बसेना मात्र तिच्यातल्या कर्तव्यदक्ष गृहिणीने लगेच डोकंवर काढलं. अगं, कसं जमेल मला इतक्या सकाळी. घरची आवराआवरी आणि मुख्य म्हणजे नव-याराला बाहेर पडण्याआधी आणि मुलाच्या क्लासच्या आधी माझा स्वयंपाक दहापर्यंत तयार हवा. बरीच कारणं द्यायला लागल्यावर, मी शेवटी तिला धमकी दिली की मी थेट तिच्या नव-यालाच ह्याबद्दल सुनवेन आणि घेऊन जाईन. हा उपाय बरोबर लागू पडला. दुस-या दिवशी छानशी तयार होऊन ती माझी वाटच बघत होती. खूपच आनंदात होती म्हणत होती अगं सासूबाई अगदी आश्चर्याने बघत राहिल्या, नव-याने थोडी मदत केली आणि मुलगा तर आग्रहाने तयार व्हायला मदत करत होता. आम्ही माझ्या आवडत्या हॉटेलात जाऊन मनसोक्त गप्पा मारत झणझणीत मिसळ हाणली. मैत्रिण तिनं उचलेल्या ह्या पावलाने अगदी हरकून केली होती. ’स्वतःसाठी आवडीचं करणं’ हीच खरी वाढदिवसाची भेट हेच सारख सांगत होती. अगदी छोटयाछोटया गोष्टीतलं स्वातंत्र्य आपल्याला आत्मविश्वास देतं, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ?
छायाचित्र - इंटरनेट