Saturday, January 25, 2020

वारीची संतुष्टी

दरवर्षी आषाढात होणारी पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याचप्रमाणे पौषात येणा-या त्र्यंबकेश्वरच्या
निवृत्तीनाथमहाराजांच्या वारीचीही परंपरा आहे. आपला धाकटा बंधू संत ज्ञानेश्वराने आळंदी येथे समाधी घेतल्यावर, थोरल्या निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. षटतिला एकादशीला निवृत्तीनाथ  महाराजांच्या समाधीवर डोके टेकायला महाराष्ट्रातून हजारो वारकरी लांबचे अंतर, पायी चालत येतात. एकादशी जशी जवळ येते तसे काही वारकरी शहरी रस्त्यांवर दिसायला लागतात. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर भजनाच्या गजरात झ्रेंडे फडकवत पालखी घेऊन दिंडया चाललेल्या असतात.

आम्हीही ह्या वर्षी वारीच्या मुक्कामी त्यांच्यात शामील झालो. पारंपारीक वेशात यायला सांगितल्याने नऊवारी, नथ वगैरे मराठी दागिने असा सगळा नटापट्टा करुन तेथे पोहोचले. अश्याच वेशात काही उत्साही सख्याही आल्या होत्या."अगं किती गोड दिसतेस! किती छान दिसतेस! नवी पैठणी का?", "नऊवारी स्वत: नेसलीस? मी तर बाई शिवूनच घेतली!", "तुझे ’अहो’ ही पारंपारीक वेशात छान दिसतायेत, नाहीतर आमचे ’हे’, नेहमीसारखेच आलेत" ...असे अनेक संवाद कानावर पडत, हास्यविनोद करत काहीश्या अप्रूपाने (कपड्यांच्या) शहरी लोकं एकमेकांना भेटत होती.


माझे लक्ष मंडपात गेले तर काही माळकरी स्त्रिया व पुरुष भजनं म्हणण्यात दंग होते. राधाकॄष्णाची भजने चालू होती आणि सारेजण आजूबाजूचे भान विसरुन हरी नामात दंग झाले होते. त्यांना आमच्या (शहरी लोकांच्या) येण्याने काहीही फरक पडला नव्हता. मग सा-यांनी मिळून मोठे रिंगण तयार केले. बायकांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, कळश्या आणि पुरुषांनी गळ्यात झांजा घालून फेर धरला. विठूच्या गजरात, संथ लयीत, प्रत्येकाने हाता-पायाचा ठेका धरला. जे नवखे होते, ते माळक-यांकडे पाहून आपला ताल नीट करत होते. हळूहळू ठेक्याची लय वाढत गेली तशी हातापायांची गती वाढली. सर्वांच्या चेह-यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. आता स्त्री आणि पुरुषांनी वेगवेगळी रिंगणं तयार केली. पुरुषांनी गिरक्या घेऊन एका लयीत फेर धरला तर इकडे स्त्रियांनीही आपल्या नाचाचा वेग वाढवला. मग सगळ्यांनी मनसोक्त फुगड्या घातल्या. गावाकडच्या मावश्या प्रत्येक शहरी बायकांना आग्रहाने आणि उत्साहाने सामील करुन घेत होत्या.

मला कौतूक सगळ्या गावच्या बायकांचे वाटत होते. त्या सगळ्याजणी (छोट्या, तरुण आणि वयस्कर) सारख्याच उत्साहाने नाचत होत्या, रिंगणात उंच उडया मारत होत्या, फुगडया घालत होत्या, मोठया झांजा वाजवत होत्या, गाणी म्हणत होत्या आणि भजनातही रंगून जात होत्या. दोन-चार फेर धरल्यावर शहरी बायका बसायला खूर्ची (खाली बसवत नव्हते!) शोधत होत्या. आजच्या भाषेत ’कार्डियो’ आणि ’स्ट्रेन्थ ट्रेनिंग’ दोन्हीही पुरेसे होऊन ही ’रीलॅक्सेशनची’ गरज पडत नव्हती. ह्यांची ’फ्लेगझीब्लिटी’ आणि ’एनर्जी’ मात्र अखंड टिकून होती. ’हॅप्पी होर्मोन्सचे’ हेच अतिशय समर्पक उदाहरण आहे असेच वाटले मला.

त्यांचा वेष अत्यंत साधा आणि रोजचा असला तरी त्यांना त्याचा अजिबात न्यूनगंड नव्हता. ठसठशीत कुंकू किंवा बुक्का लावल्याने प्रत्येकीचा चेहरा उजळला होता. भरपूर नाचून झाल्यावर दुपारी सर्वांची पंगत बसली. सुखद गारव्यात पत्रावळीवर वाढलेला साधं-वरण भात आणि बटाटयाची भाजी खाऊन सर्वांनी तृप्तीची ढेकर दिली. साधे जेवण पण त्या सा-या वातावरणात सुग्रास वाटले.





मनात आले किती ही संतुष्टता, आहे त्या परिस्थितीत भरपूर आनंद घ्यायचा आणि दुसरयांनाही द्यायचा. कुठेही एकमेकांशी स्पर्धा नाही, आपल्याला आवडेल, रुचेल त्या आवाजात विठ्ठलाची भजनं म्हणायची आणि आपल्याच तालात नाचायचे. शेजारच्याशी तुलना नाही, कमी लेखणं तर नाहीच त्याउलट ’माऊली’ म्हणत पाया पडायचे. शारिरीक कष्ट भरपूर त्यामुळे प्रत्येकाची अंगकाठी सडसडीत परिणामी शहरी आजारांशी सामाना नाही.

 शेतात खरं तर रब्बी पिकांची कामं असणार, मात्र तरी वेळ जमवून उत्साहाने सगळे वारकरी वारीत सामील झाले होते. १०-१५ दिवसांपासून चालत, भजनं म्हणत आणि आपल्या सवंगडयांशी सुख-दुःखाच्या गुजगोष्टी करत आता अगदी त्यांच्या मुक्कामाजवळ येऊन ठेपले होते. मुक्काम (destination) उद्देश असला तरी हा जो सारा प्रवास (journey) आहे तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा. ह्या प्रवासात वर्षभराची उर्जा साठवून ते शेतीच्या कामांना परत जुंपतात. त्यांचा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्याने बेभरवशाचा, मात्र तरीही निर्सगाला साक्षी ठेवूनच ते हा प्र्वास करतात. ह्या काळात थंडीही भरपूर असते, दिवस छोटा असतो मात्र ह्यांचा उत्साह मात्र खूप मोठा! एकदा एकादशीला दर्शन झाले की प्रत्येकाला आपल्या गावी पोहोचायची ओढ असते. मिळेल त्या वाहनाने वारकरी परतात मात्र त्यांच्या चेह-यावर ’काय वैताग’ हा भाव नसतो. अगदी म्हाता-या आजीबाई सुध्दा आनंदाने ट्रकच्या टपावर बसून जातात. काही उभ्याने जातात. जातांना असते चेहरयावर पसरलेली तृप्ती, ठरवलं ते साध्य केल्याचे समाधान व आशा असते पुढच्या वर्षी परत येण्याची.


आणि आपल्या ह्या लेकरांकडे पालखीतले निवॄत्तीमहाराज मात्र कौतूकाने बघत असतात...

- भाग्यश्री केंगे


फोटो - अनुराग केंगे

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...