कोरोना विषाणूने अवघ्या जगात थैमान मांडले आहे. जागतिक पातळीवर आणि देश पातळीवर त्यासोबत
लढण्यासाठी अविरत प्रयत्न चालू झाले आणि त्यातूनच आला हा लॉकडाऊन. एका विशिष्ट लयीत चाललेले आपले आयुष्य एकदम खीळ लागल्यागत थंडावले. सुरुवातीला पहिला आठवडा सक्तीने का होईना, सगळे घरी होते - अगदी ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत. ह्या आनंदात घरोघरच्या सुगरणी सुखावल्या. मुलांच्या, नवरोबांच्या फर्माइशी पूर्ण करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यामुळे डालगोना कॉफी, बनाना आईसक्रीम, पाव, रुमाली खाकरा, दहीवडे ट्रेंडींग झाले. व्हॉटसअप स्टेटस, इन्स्टा स्टोरीज आणि फेसबुक पोस्टवर ह्या पदार्थांचे फोटो मानाने अवतरले. यथावकाश "रोज काय नवीन करायचे बाई?", हा आयांचा प्रश्न आपल्या कोरोना प्रश्नापेक्षाही मोठा झाला. दर वीकएण्डला बाहेरच जेवायचे, अशी आपली संस्कृती बनल्यामुळे गृहिणींनी यु-ट्यूबला शरण जात अनेक आधुनिक पदार्थांची (थोडक्यात हॉटेलमधील) घरी करण्याची शर्थ पार पाडली. सोशल मिडियावर फोटो टाकायचे असल्याने पदार्थाची सजावट, टेबलाची मांडणीही आकर्षक व्हायला लागली. मात्र लॉकडाऊन जसजसा वाढत गेला, तसा भाजी किंवा वाणसामान मिळणे थोडे कठीण व्हायला लागले, तसा हा पदार्थांचा फॅन्सीनेस थोडा कमी झाला. गृहिणींसकट घरच्यांनाही आपले नेहमीचे जेवण आवडू लागले. मुख्य म्हणजे बाहेरचे न खाताही आपल्या आनंदाने जेवता येते आणि पोटही भरते, ह्या साक्षात्कार अनेकांना, विशेषत: मुलांना झाला. भरीसभर वाढदिवस, लग्न वाढदिवसही घरच्या घरीच साधेपणाने व आनंदाने साजरे झाले.
आपली आई-बायको किती काम करते, हे अनेकांना प्रत्यक्ष बघायला मिळाले. घरच्या मदतनीसांना सुट्टी असल्याने ते ही काम वाढलेलेच. आया जर वर्क फ्रॉम होम असतील तर हे काम आता तिहेरी झालेले. त्यामुळे अनेकांकडे मुलांनी, नव-यांनी सफाई कामे आनंदाने स्वीकारली. झाडू, भांडी ते पाककलेतली प्रगती अशा सोशल पोस्ट वाढल्या. एकामुळे दुसरा प्रोत्साहित होऊन एकूणच समाजाची मानसिकता बदलायला हातभार लागला. मात्र हा बदल किती वेळ टिकतो हे काळच ठरवेल. पण महत्त्वाचे हे की घराघरातून सहकार्याची भावना वाढीला लागली. त्याचे पडसाद समाजातही उमटले. अनेकजण मास्क बांधून गरजूंना शिधा/अन्न वाटपासाठी रस्त्यावर उतरले. ज्यांना प्रत्यक्ष शक्य नव्हते त्यांनी आर्थिक मदत पुरवली.
लॉक डाऊनच्या काळात पुरेसा वेळ हाताशी असल्याने अनेकांमधले सुप्त गुण जागे झाले. अनेकांमधले लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, वीणकाम, भरतकाम, बागकाम... आपली कलाकृती सोशल मिडीयावर पेश करून वाहवा मिळवू लागले. ह्यात सिने/टिव्ही कलाकार ही मागे नव्हते. अनेकांनी स्वतःचे युट्यूब चॅनलवर vlogs करुन आपले फॅन फॉलोवर्स वाढवले. सामान्य प्रेक्षकांबरोबर गाणी गाऊन गायकांनी व्हिडीयो प्रकाशित केले. नृत्य व योगावाल्यांनीही एकमेकांना टॅग करत कलाकृती सादर केल्या. तुम्ही कुठल्याही ठिकाणी असा, प्रत्येकाने स्वतःचा व्हिडिओ शूट करुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकसंध बांधायचा आणि पेश करायचा. त्यामुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले. टिव्हीपेक्षाही इंटरनेट हे संपर्काचे आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाले. त्यामुळे सोशल मिडीयावर ’चॅलेंज’फारच बोकाळले, जसे फिर मुस्कुरायेगा इंडिया, सिक्स पॅक चॅलेंज, साडी चॅलेंज, जोडी चॅलेंज, पुस्तक चॅलेंज, सिनेमा चॅलेंज, पाककृती चॅलेंज ...वगैरे. आता हे फोटो टाकून आपल्या दहा मित्रमैत्रिणींना टॅग करायचे, मग ते पुढच्या दहांना करणार. अश्या पध्दतीने ही साखळी पुढे वाढत राहते. ह्यात ज्ञान कमी, मनोरंजन भरपूर आणि वेळ पटकन जायला लागला. वेळ जायला आणि मनोरंजनाला हॉट स्टार, अॅमेझॉन प्राईम, एमएक्स प्लेयर, नेट फ्लिक्सच्या बरोबरीने केबल टिव्ही आणि युट्यूब आहेतच. आधीच्या पिढीने जुने सिनेमे पाहिले तर तरुण प्रेक्षकांकरता वेबसिरीज, शॉर्ट फ्लिम्सचा सागर समोर आहे. किती बघाल? थकून जाल! पण ह्या चित्रकृती संपणार नाहीत. बींज वॉच (Binge watch)ची नवी क्रेझ आली आहे. चित्रकृतींचे सगळेच्या सगळे भाग एका बसणीत बघून टाकायचे. वेळही भरपूर आणि वाटही बघायला नको! अनेकांना फक्त घरच्यांबरोबर काय वेळ घालवायचा म्हणून मग नातेवाईकांशी, शाळा, कॉलेजसोबतींशी ऑनलाईन गप्पा वाढल्या, ऑनलाईन खेळ खेळता यायला लागले. झूम, गुगल हॅंगआऊट ह्यांचा वापर भरपूर वाढला आणि आभासी जगातही माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे दिसून आले.
होता होता एका महिन्यात ऑफिसचे काम घरुन करणा-या मोठयांच्या बरोबरीने तरुणांचा व लहानांचा स्क्रीन टाईम नकळत वाढला. ऑनलाईन शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळे कोर्सेस जाहीर केले. सर्टीफिकेटचेही महत्व पटवून दिले. दहावी-बारावीचे क्लासेसवालेही ऑनलाईन क्लासरुमचे सर्मथन करायला लागले. युट्यूबर्स शिक्षकही पुढे सरसावले. आता तर शाळा आणि कॉलेजेसनी आपले वर्गच झूम आणि गुगल क्लासरुममध्ये भरवायला सुरुवात केल्याने विद्यार्थांना वही-पेनपेक्षा ही संगणक-मोबाईल आणि डेटा कनेक्शन अत्यावश्यक झाले आहे. त्याच्याशिवाय रोजचा अभ्यास पूर्ण कसा व्हायचा? खालच्या स्तरांवरच्या विद्यार्थांचे काय? खेडयांमध्ये वीज नसते त्यांचे काय? असे अनेक प्रश्न मनात येतातच. पण सध्यातरी पांढरपेशा घरातली मुलं ऑनलाईन अभ्यास करत आहेत, खरं तर असं त्यांच्या पालकांना वाटते. मात्र ऑनलाईनची ही वाट इतकी निसरडी की माऊसने अभ्यासाव्यतिरीक्त दुस-या टॅबमध्ये भलतेच काही उघडायचे नाही, हे पूर्णत: त्या विद्यार्थ्यावरच अवलंबून आहे. कारण पालकांना हे समजायला, स्क्रीनवर लक्ष ठेवायला ते आपल्या मुलांइतके नक्कीच स्मार्ट नाहीत. ऑफिसचे काम करतांनाही हेच लक्षात असायला हवे. टीम वेगवेगळ्या ठीकाणी बसलेली असतांना, आठ-दहा तास काम करुनही हवी असलेली प्रॉडक्टीव्हिटी मिळत नाही अशी कंपन्यांची ओरड आहे.
कोरोनामुळे आर्थिक मंदी आलेलीच आहे. बेरोजगारी आणि पगारातही कपात आहे. मात्र आर्थिक क्षेत्रातील अनेकांनी contingency fundsचे महत्व अधोरेखीत केले. वैयक्तिक असो अथवा व्यावसायिक, दोन्हीकडे ही आपत्कालीन रक्कम ज्यांनी राखीव ठेवली होती त्यांना फारसा त्रास झाला नाही. अनेकांना त्याची गरज पटली आहे. काही सुज्ञ गुंतवणूकदारांनी म्युच्युवल फंड आणि इक्विटीत गुंतवणूक वाढवली. २००८ सालच्या मंदीच्या काळात घाबरलेले गुंतवणूकदार आता मात्र समजदारीने वागले आहेत. ह्यात इन्शूरन्स कंपन्याही मागे नाहीत. ते प्रत्येकाला हेल्थ इन्शूरन्स व्हिथ करोनाचे महत्व सांगताहेत, टर्म प्लान घ्यायला सांगताहेत. हे असले तरी सामान्य माणसाला Spend less, Save more ह्या तत्वावर चालणे शहाणपणाचे ठरणार आहे. ह्यासाठी आपल्या आधीच्या जीवनशैलीपेक्षा अजून किती साधेपणा आणता येईल, अनावश्यक खरेदी कशी टाळता येईल हे बघायला हवे. लॉकडाऊनच्या काळात केवळ काही जोड कपडयांचे सहज पुरतात, चपलांचे एकच जोड पुरतात, गाडी नाही चालवली तर बिघडत नाही, बाहेर खाल्ले नाही तरी चालते, ह्या आणि अश्या रोजच्या राहाणीमानातल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला सहज कळल्या आहेत. खरंतर consumerism कमी करुन साधे आणि शाश्वत जगण्याकडे वाटचाल कोरोनाने करुन दिली आहे. ही वाट आता अर्धवट सोडता कामा नये, कारण त्यामूळे तरी वसुंधरेवरचा भार थोडा कमी होईल आणि पुढच्या कित्येक पिढ्या अधिक आरोग्यपूर्ण आणि आनंदी जगू शकतील.
- भाग्यश्री केंगे
bhagyashree@cyberedge.co.in
सदर लेख पालकनीती (पुणे) ह्या मासिकात प्रकाशित झाला आहे.
#COVID 19 #Corona #StayHome #Staysafe #Corona Maharashtra