Sunday, August 14, 2022

प्राजक्ताची फुले आणि स्वातंत्र्य दिनाचे स्वागत

प्राजक्ताची फुले आणि स्वातंत्र्य दिनाचे स्वागत

रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकहून  परतत असतांना, स्वातंत्र्य दिनाच्या तयारीत सारे रस्ते तीन रंगात


सजण्याच्या लगबगीत होते. कार्यकर्ते मोठया उत्साहात तीन रंगात फुगे, फिती, रोषणाईची सजावट करण्यात गुंतलेले. काही तरुणांचा गाण्याचा व लेझिमचा सराव चाललेला. सगळीकडे उत्साह आणि सकाळची प्रसन्नता भरुन राहिलेली. पावसाळ्यात सकाळचा विशिष्ट वास असतो, जास्ती पाऊस पडून गेलेल्या ओल्या मातीचा, झाडांचा आणि सकाळचा ताजेपणा अशी सरमिसळ त्यात असते. © भाग्यश्री अनुराग केंगे


ह्या ताजेपणाचा आनंद मनाला मोहवत असतांना, मंदसा ओळखीचा वास आला आणि मी सावधपणे शोधू लागले. समोरचे दृश्य पाहून गाडी तडक बाजूला लावली. एका इमारतीतला पारीजात इतका मोठा झाला होता की त्याने रस्त्यावर प्राजक्ताच्या फुलांचा सडा शिंपला होता. काळ्या रस्त्यावर केशरी देठाची पांढरी फुले इतकी सुंदर दिसत होती! मी सरळ त्यांना वेचायला सुरुवात केली. वेचता वेचता मन बालपणात मुशाफिरी करुन आले. © भाग्यश्री अनुराग केंगे

आमच्या सोसायटीत चैत्र आणि वैशाखात येणारी कुंद, नेवाळी, सायलीची फुले तोडायची चढाओढ असायची तर श्रावण आणि भाद्रपदात बेल आणि प्राजक्ताची फुले वेचण्याची. वेचतांना ताजीच वेचायची, त्याला चिखल लागलेला नको आणि पाकळ्या कोमेजलेल्या नकोत. आताही मग मी तशीच वेचायला सुरुवात केली. झाडालाही जणू हे कळले असावे, वा-याच्या झुळूकी सरशी तो आणखी फुले खाली पाडत होता आणि माझी ओंजळ भरत होती. भर रस्त्यातले माझे हे फुले वेचणे सकाळी फिरायला जाणारे आश्चर्याने बघत होते. काही ’बहाद्दर’ दुचाकी आणि चारचाकीचा मुद्दाम हार्न वाजवून पुढे जात होते. मी मात्र कशाचाही विचार न करता  मनसोक्त फुले वेचली, फोटो काढले आणि त्यांच्या सुगंधात  तरंगतच घरी पोहोचले. हिरवेगार पारिजातकाचे झाड, पांढ-या पाकळ्या आणि केशरी देठ... अरेच्चा, निसर्गही भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवाचीच तयारी करतोय तर! मनाने तिरंग्याशी त्याची सांगड घातली. © भाग्यश्री अनुराग केंगे

थोडयाच वेळात रहदारी सुरु होईल. गाडयांखाली फुलं चिरडून जातील आणि पेट्रोलच्या दर्पात त्यांचा सुगंध हरवून जाईल. मात्र रात्री हे सगळे शांत झाले की कळ्या परत उमलायला लागतील कारण उदया सकाळी त्यांना फुलायचे आहे ना, आपल्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दयायला! तोच सुगंध, आणि तेच तीन रंग.

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनी सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले !

© भाग्यश्री अनुराग केंगे

# 75th Independence day
#
Independence day
#
Independence day celebration
#
Har ghar Tiranga
# Good Morning
# Parijat flowers
# Harsingar
# I love India





LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...