Wednesday, August 31, 2016

मनी गणेश वसावा

गेल्या आठ वर्षांपासून मी घरी शाडू मातीचा गणपती तयार करते आहे. कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता दरवर्षी चुकतमाकत हे शिकणे सुरुच आहे. पहिल्या वर्षी गणपती तयार करायला घेतला तेव्हा पर्यावरणाच्या हिताचाच विचार मनात होता. दोन्ही मुलांनाही त्यात सहभागी केले त्यामुळे प्रत्येक वर्षी गणेशमूर्ती तयार करणे हा आम्हा सर्वांसाठी सृजनात्मक अनुभव झाला. आईच संपूर्ण जवाबदारी घेते आहे म्हटल्यावर मुलांनी त्यांना इतर ’अधिक महत्त्वाची’ कामे आहेत असे सांगून अंग काढून घेतले. त्यामुळे आता प्रत्येक वर्षी गणरायाला घडवणे माझ्याकडे आले.

प्रत्येक वर्षी माती भिजवतांना माझ्या मनात उत्साहाबरोबरच धाकधूक असते. मातीला प्रथम वंदन करुनच भिजवायला घेते. अनेकांनी मला प्रश्न विचारलेत की तू एखादे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवतेस का ? सुरुवात कशी करतेस ? किती किलो माती लागते ? मूर्ती किती मोठी असावी हे कसे ठरवतेस ? दागिने, आसन वगैरे आधीच ठरवून ठेवतेस का ?... वगैरे वगैरे. आता खरंतर हे प्रश्न एखाद्या वाकबगार कलाकाराला किंवा मूर्तीकाराला विचारणे आणि त्याने उत्तर देणे ठिक आहे. मात्र माझ्या सारख्या हौशी कलाकाराला (?) हे विचारल्यावर माझे उत्तर असते, " मी काही ठरवून करत नाही" .

हो अगदी खरे आहे. स्त्रीला सृजनशील म्हटले आहे ते उगीच नाही. छोटा अंकूर जेव्हा स्त्रीच्या उदरात फुलतो तेव्हा तिला तरी त्याचे रंग-रुप कोठे माहित असते. नऊ महिने त्याची हालचाल जाणवते मात्र त्याचे रुप काही केल्या डोळयासमोर येत नाही. अगदी श्रीकृष्णाचा, बाबाचा, आजी-आजोबांचा चेहरा समोर आणला तरीही नाही. तिच्या पोटात वाढणारा तो एकमेव आणि अद्वितीय असतो/असते.


दरवर्षी भाद्रपद जवळ आला की मी माती कालवून ठेवते मात्र मनापासून करावेसे वाटत नाही तोपर्यंत गणपती तयार करायला घेत नाही. माती सारखी करतांना हळूहळू त्याचे रुप मनात साकारत जाते.

मातीचे गोळे एकमेकांवर ठेवल्यावर, त्यातून मूर्ती घडवतांना human anatomy डोळ्यासमोर येते, मात्र कलाकार म्हणून आपली मर्यादा जाणवत रहाते. मग सुरु होते तगमग ! कसे असायला हवे हे माहिती आहे मात्र साकारता येत नाही. बिघडण्या-घडण्याच्या ह्या अस्वस्थतेत आपल्या गणेश बाळाचे रुप साजिरे व्हावे ह्यासाठी ही धडपड असते. आता माझ्यातल्या कलाकारापेक्षा आई अधिक वरचढ झालेली असते. मला वाटते प्रत्येक कलाकार पालकत्वाच्या भूमिकेत नकळत असाच शिरत असावा. मूर्ती पूर्ण झाल्यावर, ’काही राहिले आहे का’ असे विचारल्यावर खरंतर कुणी काही चुका सांगाव्या असे अजिबात वाटत नसते. कारण शेवटी, आपले मूल जसे आहे तसेच आईला आवडते. मला ह्यावेळी हटकून पार्वतीची गोष्ट आठवते. तिनेही गणरायाला असेच आपल्या मळापासून घडवले आणि हत्तीचे तोंड बसवावे लागल्यावर मनापासून कवटाळले. असो, तर दरवर्षी ही भावना माझ्या मनात उचंबळून येते.




आता मूर्ती तयार झाली आहे. रंगवल्यावर माझ्या ह्या श्री गणेशाचे रुप आपल्या समोर येईलच. त्याबद्दल प्रतिक्रियाही येतील. मात्र मला सृजनाचा आनंद देणारा हा गणेश माझ्या मनी वसला आहे.



गणपती बाप्पा मोरया !!

Saturday, April 9, 2016

फ्रुटखंड

चैत्राच्या पालवीसह नाविन्याची आस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा नववर्ष सण ! एव्हाना थंडी संपून ऊन चांगलेच तापायला लागलेले असते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यातही साहजिकच बदल होतात. नुकतीच होळीला खाल्लेली पुरणपोळी लगेचच येणा-या गुढीपाडव्याला नको असते. तेव्हा आवर्जून हवे असते केशर-वेलची घातलेले थंडगार श्रीखंड ! श्रीखंडाचा उल्लेख महाभारतात आढळतो. असे म्हणतात भीमाने हा पदार्थ सर्वात प्रथम केला होता. आयुर्वेदातही श्रीखंड तयार करण्याच्या कृतीला महत्त्व आहे. आजकाल बाजारात दूध पावडर टाकून, कृत्रिम रंग घालून तयार केलेल्या फ्लेवर्ड श्रीखंडाला फारशी चवही नाही आणि आरोग्यासाठी चांगलेही नाही. असो. दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी मी गुढीपाडव्या पारंपारिक स्वयंपाक केला होता. श्रीखंडही होतेच. मात्र ह्यावेळेला काहीतरी नवीन व्टिस्ट द्यावा ह्या हेतूने फ्रुटखंड केले. मुलांना अर्थातच फ्रुटकर्स्टड्चे हे पारंपारिक आणि आरोग्यपूर्ण रुप खूपच आवडले.

साहित्य :

१/२ कि. तयार अथवा घरी केलेले श्रीखंड
१/२ वाटी दूध
१/२ वाटी सुकामेवा (आवडत असल्यास)
विविध फळं - केळ, चिकू, डाळिंब, द्राक्ष, खरबुज

तयारी

१. डाळिंबाचे दाणे खूप आंबट नाही ह्याची खात्री करुन सोलून घ्यावे.
२. द्राक्षे धुवून, आंबट नाही ह्याची खात्री करुन, एका द्राक्षाचे दोन भाग करावे.
३. खरबुजाचे साल सोलून छोटे काप करुन घ्यावे
४. चिकूची साले काढून छोटे काप करावे
५. शेवटी केळ्याचे छोटे काप करावे.

कृती

सर्व कापलेली फळे श्रीखंडात ताबडतोब घालून सर्व श्रीखंड नीट हलवून घ्यावे. श्रीखंड खूप घट्ट असल्यास
२ चमचे दूध घालावे. मात्र जास्त नको कारण फळांचा रस सुटून श्रीखंड पातळ होतेच. श्रीखंड गार करायला ठेवा. पारंपारीक जेवणातला हा बदल सगळ्यांनाच आवडेल.



काहीजण ह्याच्यातच काजू, पिस्ते, चारोळ्या वगैरे सुकामेका घालतात. मात्र फळांची चव कमी होते म्हणून मी सुकामेवा घालत नाही.

टीप : थ्री कोर्स मेन्यूमध्ये फ्रुटखंड हे डेर्सट म्हणूनही सर्व्ह करु शकता.

Wednesday, March 23, 2016

खुल के जियो

रविवारच्या निवांत सकाळी, दूरदर्शनची रंगोली पाहतांना होळीच्या जाहिरातीने  (#KhulKeKheloHoli)मन वेधून घेतले. एका वृध्दाश्रमात, सगळी वयस्कर मंडळी गप्पांमध्ये रंगलेली असतात. मात्र एक आजोबा वृध्दाश्रमात चालेली रंगांची तयारी पाहून हरकून जातात. जरा इकडे तिकडे जाऊन वेध घेतात आणि विविध रंग त्यांच्या नजरेस पडतात. मग काय, त्यांच्यातले लहान मूल जागे होते. हळूच रंग चोरुन खिशात टाकतात. वृध्दाश्रमातली त्यांची मैत्रिण मात्र हे सगळं पहात असते. आजोबा आता मित्रांना रंग लावायची संधीच शोधत असतात. तेव्हाच तरुण मुल-मुली सगळ्यांना भेटायला येतात. सगळ्यांना सावरत, जपत, टिळा लावत, मिठाई भरवत, शुभेच्छा देत, 'होळी' साजरी करतात. आजोबांना मात्र अशी जपून-सावरुन साजरी केलेली फॉर्मल होळी अजिबात आवडत नाही. त्यांच्या चेह-यावर निराशा स्पष्ट दिसते. इतक्यात त्यांची मैत्रिण येते आणि ध्यानीमनी नसतांना संपूर्ण चेह-यावर रंग फासते. आजोबा आणि जमलेले सगळेच आश्चर्यचकित होतात आणि मैत्रिण खट्याळपणे म्हणते , " एक चुटकीसे क्या होगा ? खूल के खेलो होली ! "


होळीच्या विविध रंगांसारखीच ही जाहिरात जीवनाचा विविध प्रकारे विचार करायला लावते. रोजच्या आयुष्याच आपलं जगणंही असंच सावरत, मोजून-मापून. आपल्यात दडलेल्या मुलाला अनेक गोष्टी करुन बघायच्या असतात. शेजारच्या बागेतली फुलं चोरायची असतात, फळं तोडायची असतात, मोठ्याने ओरडून गाणं म्हणायचं असतं, ऑफिसमध्ये खदखदून हसायचंही असत. पण आपण मात्र "सॉरी, एक्सक्यूज मी, इट्स ओके....", अश्या ब-याच फॉर्मॅलिटिजमध्ये अडकून पडतो. वेळोवेळी ह्या मुलाला दटावतो, गप्प करतो आणि मोकळेपणाने जगायचे नाकारतो.

होळीच्या निमित्ताने मिळालेला हा ’खुल के जियो’ चा संदेश लक्षात ठेऊन मोकळेपणाने जगायला काय हरकत आहे ? तुम्हाला काय वाटते ?



LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...