Monday, January 16, 2017

बापू, तू तो सेहत के लिए हानिकारक है

"बापू, तू तो सेहत के लिए हानिकारक है..." दंगलमधल्या गाण्यात आमिरखान आपल्या दोन्ही मुलींकडून कसरत करुन घेत असतो... आणि पुढे संपूर्ण चित्रपटभर मला मात्र माझे बालपण आठवत रहाते.

माझेही बापू 
म्हणजेच बाबा थोड्याफार फरकाने असेच होते. नाशिकच्या गुलालवाडी व्यायाम शाळेत कसून व्यायाम करत असत. हळूहळू कुस्तीचा सराव सुरु केला आणि गावात होणा-या स्थानिक स्पर्धात भाग घ्यायला सुरुवात केली. जिंकल्यावर एक नारळ आणि रु. ५ असे बक्षिस असे. मात्र त्या पाच रुपयात पांडे मिठाईकडे अर्धा शेर दूध आणि भगवंतराव हॉटेलमध्ये पावशेर जिलबीची चैन करता येत असे. बाबांची ही व्यायामाची आवड त्यांनी बाबाझाल्यावर माझ्यावर हक्काने भागवायला सुरुवात केली. आमच्या रोजच्या व्यायामसत्रात मला किमान ५ कि.मी धावावे लागत असे. त्याच्याबरोबरीने कधी सायकलिंग, कधी बॉल किंवा रबरी रींगने २०० ट्प्पे गाठणे तर कधी चिंच किंवा आंब्याच्या झाडावर चढण्याचा सराव करावा लागत असे. ह्या झाडांना त्यानी दो-या बांधलेल्या असत त्यामुळे दो-यावरुन वर चढणे (रोप क्लाईमबिंग), दाराला बांधलेल्या आडव्या बारवर पुशअप्स करणे, दाराच्या दोन्ही उभ्या पट्ट्यावर पाय ठेवून सरसर वर चढणे, एका पायावर जास्त वेळ उभे रहाणे, पंजा लढवणे असे आणि अनेक वेगवेगळे व्यायामप्रकार ते शोधून काढत असत. आठवडाभर संध्याकाळचा हा व्यायाम करणे कमी होते म्हणून की काय ते दर रविवारी सकाळी रामकुंडावर पोहायला घेऊन जात. आजूबाजूची मुले उंचावरुन उडया घेत आणि सहज पोहत असत. मला मात्र जाम भिती वाटत असे. बाबांनी तर व्हिकटोरीया पुलावरुनही उडी मारलेली होती. माझी भिती जावी म्हणून एका संध्याकाळी ते मला सोमेश्वरला घेऊन गेले आणि गोदावरीत अगदी दूरवर पोहत गेले. बाबा इतके दूरवर पोहत गेले की माझे मन अगदी अभिमानाने भरुन गेले.


आज आपण जीम आणि त्याच्या उपकरणांबद्दल बोलतो, मात्र बाबांची व्यायामाची पध्दत अजब होती. जोर-बैठका काढतांना ते मला पाठीवर बसायला किंवा झोपायला सांगत. वर-खाली उठबस करणारे बाबा आणि त्याच लयीत झुलणारी मी ! माझी तर तंद्रीच लागत असे. त्यांच्या हातांना मी लटकत असे आणि मग ते जास्तीजास्त वेळ मला पेलवत असत. सर्वांगासन करतांना ते दोन्ही पावलांवर उचलून उंच धरत. कधी मला एकदम ताठ उभं रहायला सांगून, पायाला धरुन हाताने सरळ उचलत. आजच्या भाषेत त्यांचे हे स्ट्रेंग्थ ट्रेनिंगच होते. थोडी मोठी झाल्यावर त्यांनी मला राजा शिवाजीकेंद्रात दाखल केले. पहाटे साडेपाचला तेथे हजर व्हावे लागायचे. व्यायामाच्या विविध प्रकाराच्या बरोबरीने भाला फेक, गोळा फेक, रोप क्लाईमबिंग करावे लागायचे. सकाळचे दोन तास भरपूर कसरत होत असे. ५वीच्या मे महिन्याच्या सुट्टीत त्यांनी मला (संघाच्या) समितीच्या निवासी शिबिरासाठी राणी लक्ष्मी भुवन मध्ये दाखल केले. तेथेही दिवस पहाटे पासून सुरु व्हा्यचा आणि रात्री आठला संपायचा. शारिरीक संवर्धनाबरोबरच मानसिक कणखरपणावर तेथे भर होता. त्या शिबिरात मी वयाने सर्वात लहान होते तरी आपली सर्व कामे स्वताः करणे, वाढलं असेल ते आनंदाने खाणे आणि सर्व प्रकारच्या लोकांमध्ये मिसळून राहणे हे जीवनावश्यक धडे मला मिळाले. मात्र आई-बाबांना महिनाभर भेटता येत नाही ह्याची खंत बालमनाला होतीच. शाळा चालू झाल्यावर बाबांनी खो-खो खेळायला घातले मात्र त्यात मन रमेना. त्यामुळे टप्पे मारायला सुरुवात केली. पण बाबा स्वस्थ बसू देतील तर नां. त्यांना मुलींचे स्वसंरक्षण फार महत्त्वाचे वाटत असे. आपल्या मुलीला स्वसंरक्षण यायलाच हवे म्हणून मला ज्यूदो शिकायला घातले. मित्रविहारमध्ये आधी व्यायाम आणि मग दोन तास गादयांवर वेडेवाकडे पडणे, दुस-यांकडून स्वतःला पाडून घेणे, वेगवेगळ्या मूव्हवीस-पंचवीसवेळा करणे ह्या सर्व सरावाने माझी हाडं अक्षरशा खिळखिळी होत. ठणकत असत. मी अगदी थकून जात असे. ज्यूदो शिकायची सक्ती करणारे बाबा, रात्री मात्र माझे अंग चेपून देत....


 ... झोपलेल्या गीता-बबीताचे पाय चेपतांना आमिर म्हणतो, "मैं एकबार में, एक ही हो सकता हूं, या कोच या पिता". सिनेमा पाहतांना बाबांच्या ह्या बाबागिरीचाअर्थ मला उलगडला. आपल्या मुलीला व्यायामाची आवड लागावी ह्यासाठीच तर बाबांचा हा अट्टाहास होता.  

Monday, December 5, 2016

मिसळ आणि स्वातंत्र्य





मैत्रिणींबरोबर सहजच गप्पा मारायला किंवा बाहेर जेवायला जाणं आजच्या शहरी स्त्रियांना काही विशेष वाटत नाही. अगदी छोटया गावातही कॉलेजच्या तरुणी आणि विवाहीत युवतीही असे स्वातंत्र्य उपभोगत असतात. ह्या स्वातंत्र्याचा स्वीकार आपल्या मनाने इतका सहज केलेला असतो की आपल्याला त्याचे फारसे काही अप्रूप वाटत नाही. मात्र गेल्या आठवडयात मला ह्या स्वातंत्र्याने नक्कीच विचारात पाडलं. माझी  एक पारंपारीक सुखवस्तू घरातली मैत्रिण एके दिवशी सहज बोलता बोलता म्हणाली की तिने अजून बाहेरची (हॉटेलमधली) मिसळ तिथेच बसून खाललेली नाही. मला जवळ जवळ चक्कर यायची बाकी होती. कारण आमच्या शहरात एक से एक मिसळीची ठिकाणं आहेत. त्याविषयी खवय्ये अनेक ब्लॉग्स आणि व्हॉसअ‍ॅपवर भरभरुन कौतूक करतच असतात. बाहेरगावाहून आलेला पाहुण्यांना हमखास मिसळीचा झणझणीत नाश्ता ठरलेलाच असतो. असो...

तर माझ्या ह्या मैत्रिणीचे घर अगदी पारंपारीक आहे. जेवणाच्या वेळा ठराविक. रोजचं जेवणही साग्रसंगीत दोन भाज्या, कोशिंबीर, वरण-भात आणि जेवायला बसल्यावर गरम फुलके. जेवण दोन्ही वेळेला ताजं आणि गरमच वाढल पाहिजे हा नियम. त्यामुळे स्वयंपाकाची वेळ झाली की माझ्या ह्या मैत्रिणीची घालमेल होते. असेल तिथून ती थेट घराकडे धाव घेते. मी कित्येकदा तिला समजावून सांगितले की अगं मग करुन येत जा नं. त्यावर हिचं लाडिक उत्तर की अगं नव-याला आणि मुलाला मीच वाढायला हवं असतं. स्वतःच्या हातानेच काय, सासूबाईंकडून सुध्दा वाढून घेत नाही. तिच्या ह्या कौतूकाच्या बोलण्यावर मी कपाळावर हात मारुन घेतला ( आणि मनात माझ्या नव-याला पाठीवर कौतुकाची थाप दिली. कारण आमच्याकडे बरोबर उलटी परीस्थिती, मी थांबायचं म्हटलं की नवरा आणि मुलं एकसुरात म्हणणार आम्ही मॅनेज करु गं, तू जा !) मात्र माझ्या इतक्या कर्तव्यदक्ष मैत्रिणीला मिसळसारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळू नये ह्याची फार खंत वाटली.

गेल्या आठवडयात ह्याच मैत्रिणीचा वाढदिवस झाला. आदल्या दिवशी मी तिला फोन केला की बरोबर आठ वाजता मी तूला घ्यायला येईन आणि मग आपण मिसळ खायला जाणार आहोत. ऐकल्यावर आनंदाने तिचा विश्वासच बसेना मात्र तिच्यातल्या कर्तव्यदक्ष गृहिणीने लगेच डोकंवर काढलं. अगं, कसं जमेल मला इतक्या सकाळी. घरची आवराआवरी आणि मुख्य म्हणजे नव-याराला बाहेर पडण्याआधी आणि मुलाच्या क्लासच्या आधी माझा स्वयंपाक दहापर्यंत तयार हवा. बरीच कारणं द्यायला लागल्यावर, मी शेवटी तिला धमकी दिली की मी थेट तिच्या नव-यालाच ह्याबद्दल सुनवेन आणि घेऊन जाईन. हा उपाय बरोबर लागू पडला. दुस-या दिवशी छानशी तयार होऊन ती माझी वाटच बघत होती. खूपच आनंदात होती म्हणत होती अगं सासूबाई अगदी आश्चर्याने बघत राहिल्या, नव-याने थोडी मदत केली आणि मुलगा तर आग्रहाने तयार व्हायला मदत करत होता. आम्ही माझ्या आवडत्या हॉटेलात जाऊन मनसोक्त गप्पा मारत झणझणीत मिसळ हाणली. मैत्रिण तिनं उचलेल्या ह्या पावलाने अगदी हरकून केली होती. ’स्वतःसाठी आवडीचं करणं’ हीच खरी वाढदिवसाची भेट हेच सारख सांगत होती. अगदी छोटयाछोटया गोष्टीतलं स्वातंत्र्य आपल्याला आत्मविश्वास देतं, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ?

छायाचित्र - इंटरनेट

Saturday, November 26, 2016

बदलते (तंत्र)ज्ञान

फेसबुक स्टेट्स अपडेट्स, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन मनी ट्रान्सफर, अमेरिकेतल्या मुलाशी स्काईप... ही आणि अशी अनेक वाक्य आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आहेत. खरंतर हा बदल तसा अलिकडचा, मात्र झपाटयाने झालेला. संगणक, इंटरनेट आणि आता स्मार्ट मोबाईल फोन्समुळे ही क्रांती शक्य झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत नवीन पिढी लगेच करतेच मात्र त्याची उपयुक्तता लक्षात आलेली मागची पिढीही (साधारण ६०-७० वयोमानाची) ऑनलाईन बॅंकींग, सोशल संकेतस्थळ, व्हॉटसअ‍ॅप अतिशय आत्मविश्वासाने हाताळते आहे. ही ख-या अर्थाने तंत्रज्ञानाची क्रांती आहे.

भारतात इंटरनेटचा वापर साधारणपणे १९९४ साली सुरु झाला. त्याच दरम्यान आम्हीही आमच्या घरी (मुंबईत VSNL मध्ये अर्ज करुन) इंटरनेट कनेक्शन घेतले. त्यावेळेला 'एक्सटर्नल मॉडेम’ वापरात होता. नेटवरच्या वेबसाईट्सही फक्त माहिती किंवा चित्रांसह दिसायच्या. हे सगळे फोन वरुन डायलिंग असल्यामुळे बहुतेकवेळा बील आटोक्यात रहाण्यासाठी चित्र बंद ठेऊन माहितीच वाचली जायची, आणि हो, STD डायलिंग असल्यामुळे बहुतेक वेळा कामही रात्री ११ नंतर करणे फायद्याचे होते. अगदी निकड असेल तर आम्ही रविवारी मुंबईला फक्त नेट सर्फींगसाठी सुध्दा जायचो. त्याच वेळेला निश्चित केले होते की आता हेच आपले कार्यक्षेत्र असणार आहे. त्यादृष्टीने अभ्यास, माहिती गोळा करुन डिसेंबर १९९७ मध्ये आम्ही नाशिकची पहिली वेबसाईट www.nashik.com उभी केली. फेब्रुवारी २००० मध्ये मराठी दिनाच्या दिवशी भारतातली पहिली मराठी वेबसाईट www.marathiworld.com चालू केली. त्यावेळी ही घटना नाशिककरांसाठी नवीन आणि थोडीशी न समजण्याचीच होती पण परदेशात असलेले नाशिककर तसेच जगभरातील मराठी माणसांनी मात्र आमचे भरभरुन कौतूक केले.

अमेरीकेत इंटरनेटचा शोध आणि वापर १९८१ साली सुरु झाला. तेव्हा फक्त लष्करी सेवेसाठी उपलब्ध असलेली ही सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. १९९१ मध्ये World Wide Web सुरु झाल्यावर इंटरनेटची लोकप्रियता वाढायला लागली. ह्याचे मुख्य कारण होते की लोकांना रंगीत स्वरुपात विविध माहिती, छायाचित्रं आणि चलचित्रांसकट वाचता येत होती. त्यावेळी फक्त इंग्रजीत असणारी, अल्पसंखेत असणारी संकेतस्थळं आजच्या घडीला विविध भाषेत ८००,०००,००० पेक्षाही जास्त आहेत. मातृभाषेत माहितीची देवाणघेवाण उपलब्ध झाल्यामुळे अल्पशिक्षितही ह्या तंत्रज्ञानाचा लाभ घेतांना दिसतात. माहिती व्यतिरिक्त इतरही सेवा देण्यात याव्या ह्या उद्देशाने १९९५ साली Amazon.com ही वस्तू खरेदी-विक्रीची वेबसाईट अमेरिकेत सुरु झाली. तेव्हा क्रेडीट-डेबिट कार्ड पध्दत आपल्याकडे नसल्याने भारतात त्याची फारशी लोकप्रियता नव्हती. १९९६ साली भारतीय तरुण सबीर भाटियाने इंटरनेटवर Hotmail ही मोफत इमेल सेवा सुरु केली. काही क्षणात जगाच्या कानाकोप-यात, अत्यंत कमी किंमतीत, संपर्क साधता येणारी ही इ-मेल सेवा मायक्रोसॉफ्ट कंपनीने ’काहीशे’ कोटी डॉलर्सना विकत घेतली. एका भारतीयाच्या ह्या तांत्रिक क्रांतीमुळे तरुणांना अमेरिकेत सॉफ्टवेअर्सच्या संधी उपलब्ध झाल्या. अनेक मोठ्या कंपन्याही आपले बस्तान भारतात बसवू पाहात होत्या.

त्याचवेळेला १९९८ साली गुगलने आपले सर्च इंजिन आणले. फक्त इंग्रजीत आपली सेवा देणारे हे सर्च इंजिन अल्पावधितच प्रत्येक भाषेमध्ये सेवा देऊ लागले आणि इंटरनेटवरच्या महाकाय माहितीपर्यंत एका चुकटीसरशी पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे गुगल अर्थातच इतके लोकप्रिय झाले की, आज एखादी माहिती शोधायची असल्यास ” अहो, गुगल करा नां !” असा शब्द प्रयोग वापरात आला. गुगलमुळे इंटरनेटवरचे बिझिनेस मॉडेल बदलले. गुगल अ‍ॅनालिटिक्स आणि गुगल अ‍ॅडसेन्सद्वारे इंटरनेटवर जाहिरातींच्या सहाय्याने पैसे कमावता येऊ लागले. त्यामुळे संकेतस्थळांच्या बरोबरीने ब्लॉग्सचा जन्म झाला.

२००४ साली हे तंत्रज्ञानाचे वारे इतके सैराट सुटले कारण एव्हाना फेसबुकचा जन्म झालेला होता. सुरुवातीला साधारण वाटणारे हे बाळ आता चांगलेच तरुण झाले आहे. लोकप्रियता तर इतकी आहे की एकवेळ तुमचे आधारकार्ड नसेल मात्र फेसबुक अकाऊंट हवं असं तरुणाईचं मत आहे. आपलं हे ऑनलाईन रुप बहुतेकजण साजिरं ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. तुमच्या व्यवसायाचे संकेतस्थळ असले तरीही त्या कंपनीचे फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. फेसबुक वापरायला इतकं सोप्प की कंपनीच्या वॉचमनपासून बॉसपर्यंत सगळेच ’फ्रेन्ड’ यादीत मोडतात. फेसबुकचे हात धरुन पाठोपाठ गुगल प्लस, व्टिटर, युट्यूब, लिंक्ड इन, पीइंटरेस्ट, पिकासा, इन्स्टाग्राम अवतरले. ही सगळी संकेतस्थळं खास सोशलानेटवर्कींटसाठीच आहेत मात्र प्रत्येकाचा आशय आणि उद्देश वेगवेगळा. त्यामुळे आजच्या घडीला तुम्ही ह्यांचे सभासद नसाल तर तुमचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.

सोशल नेटवर्कींगच्या बरोबरीने संकेतस्थळांच्या तंत्रज्ञानातही खूप प्रगती झाली. पूर्वी फक्त माहितीसाठी मर्यादीत असलेली संकेतस्थळ आता सॉफ्टवेअरच्या बरोबरीने काम करतात. त्यामुळेच तर तुम्ही ऑनलाईन बॅंकीग, ऑनलाईन रेल्वे आरक्षण, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन पासपोर्ट, आधारकार्ड, सातबारा अश्या आणि इतर जीवनाशी निगडीत गोष्टी ह्या संकेतस्थळांवर करु शकता. तंत्रज्ञानाने अजून एक पाऊल पुढे टाकत ह्या सर्व गोष्टी ’अ‍ॅप’ द्वारा आपल्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्मार्ट फोनवर कमी किंमतीत संपर्काची क्रांती केली व्हॉटअ‍ॅपने. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटअ‍ॅपची ताकद फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गने ओळखली आणि चक्क १९ बिलियन डॉलर्सला ही कंपनी विकत घेतली. सातत्याने नवीन फीचर्स आणणा-या ह्या तंत्राचे रोज १ मिलियन नवीन सभासद येतात. नुकत्याच आलेल्या ’आभासी तंत्रज्ञानाने’ विकसित केलेल्या ’पोकेमान गो’ ह्या खेळाने जगाला वेड लावले आहे. ह्या तंत्रात संगणकाने तयार केलेल्या प्रतिमा वास्तव जगात उमटवल्या जातात.


इंटरनेटच्या ह्या सेवा तुम्ही विनासायास घेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे उत्तम वेगाचे इंटरनेट असेल आणि संगणक किंवा फोन अद्यावत असेल तर. दर काही महिन्यांने नवीन येणारे संगणक किंवा फोनचे तंत्रज्ञान आपण वाचत असतोच. मोठे स्क्रीन्स, जास्त वेगाच्या प्रोसेसर चिप्स आता बाजारात आहेत. आता USB तर 256 GB इतक्या क्षमतेतही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे VSNL ते JIO हा इंटरनेट वेगाचा प्रवासही थक्क करणारा. पूर्वी अर्ज करुन प्रतिक्षे नंतर मिळणारे इंटरनेट कनेक्शन आज मात्र ब्रॉड बॅण्डचा रुपात जवळच्या टेलिफोन ऑफिसमधून विकत घेता येते. जोडणी नंतर केबलच्या सहाय्याने आपल्या संगणकावर इंटरनेट अवतरते. टेलिफोन लाईन आपल्या घरात नको असल्यास 2G/3G/4G मोबाईल फोन नेटवर्क द्वारे इंटरनेट मिळू शकते.   तुमच्या इंटरनेट्ची क्वालिटी किंवा मोबाईल ब्रॉडबॅण्ड सिग्नल हा तुमच्या 3G/4G मोबाईलच्या सिग्नलवर अवलंबून असतो. आजच्या काळात हे तंत्रज्ञान खूपच चलती असणारे आहे. फायबर ऑप्टीक्स हे ब्रॉड बॅण्डचे आणखी एक अतिशय नवीन असे तंत्र. परंतु त्यांची सेवा थोडी मर्यादीत व महाग आहे कारण ब-याचश्या कंपन्यांचे केबल किंवा वायर टाकण्याचे काम चालू आहे. नुकत्याच आलेल्या JIO ने तर क्रांतीच केली आहे. Voice over Long Term Evolution (VoLTE) चे तंत्र वापरुन जियोने बोलण्याचे तंत्र सुस्पष्ट तर केलेच पण त्याच बरोबर voice आणि data एकाच वेळेला अतिशय चांगल्या वेगाने वापरायची सोय ग्राहकांना दिली. अतिशय कमी दरात ही सेवा देत असल्याने कमी कालावधीत जियोचे लाखो ग्राहक आहेत.

तंत्रज्ञानाने कमी कालावधीत अनेक उपयुक्त गोष्टी आपल्यापुढे आणल्या. ज्या प्रगतीसाठी उपयुक्त आहेत. मात्र त्याचे दुष्परिणामही आहेत. आज तंत्रज्ञानाने पिढीचे अंतर कमी केले इतके की दर दहा वर्षात पिढी बदलते. आजच्या पिढीत नवीन जन्माला आलेल्या बाळाची ओळख कॅमेरा फोनशी आधी होते आणि मग वास्तव जगाशी. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. हा माहितीचा अल्लादिनचा राक्षस असल्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही सहजपणे ताबा मिळवू शकतो. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर करतांना तुम्हाला सातत्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सदर लेख महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रसिध्द झाला आहे

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...