Thursday, May 16, 2024

सापडलेल्या 'लापता' लेडीज

 सध्या भरपूर कौतूक होत असलेला आणि चर्चेत असलेला सिनेमा 'लापता लेडीज' पाहणे नितांत सुंदर अनुभव आहे. कलाकारांचे अभिनय सरस आहेतच पण त्यापेक्षा मला घडणारे विविध प्रसंग आणि त्या अनुषंगाने लिहिलेले संवाद अधिक लक्षात राहिले. सिनेमाची नायिका फूल, लग्न झाल्यावर पहिल्यांदाच घुंघट ओढते आणि चालतांना नेमकी ठेच लागते. त्यावर आईने लेकीला केलेली पहिली टिपण्णी अशी की आता सरळ बघून चालण्यापेक्षा मान खाली घालून चालायची सवय ठेव. रेल्वेत हुंडयावर चर्चा चालू असते, नव्या नव-या घुंघटच्या आडून मान खाली घालून फक्त ऐकत राहतात कारण परत घरचे संस्कार आणि समाजाचा दबाव. चुकामूक होऊन, फूल रेल्वे फलाटावरच हरवते तेव्हा घाबरुन जाते. मात्र त्याही परिस्थितीत ती रात्र स्त्री शौचालयात काढण्याचा सुज्ञपणा दाखवते.


रेल्वे स्टेशनवर तिची भेट होते, रागीट पण कणखर असणा-या मंजूदादीशी. अनेक पावसाळे पाहिलेली आणि पूर्वानुभवाने कर्मठ झालेली दादी फूलला ठामपणे सांगते की लग्न झाले, दोन दिवस एकत्र राहूनही झाले, दागिनेही देऊन झाले... आता तुझा नवरा परत येणे शक्यच नाही.  'भले घर की बेटीयॉं' ह्या नावाखाली समाजाची जी काही बंधने मुलींवर लादली जातात, त्याला तर मंजूदादी समाजाचा मोठा fraud म्हणते. परखडपणे तिला परिस्थितीची जाण देते की तुला तुझ्या आईने सगळे घरकाम शिकवले, त्यात हुशार केले पण बाहेरचे जगात कसे वावरायचे हे काही शिकवलेच नाही. फूल मात्र, त्याच घरकामाच्या जीवावर ठामपणे म्हणते की माझ्या आईने दुस-याच्या स्वयंपाकघरात ते आपले समजून काम करायला शिकवले आहे. त्यामुळेच फूल कलाकंद बनवून तिची पहिली कमाई तर करतेच आणि त्यामुळे आलेल्या विश्वासाने म्हणते की घरी गेल्यावरही छोटेसे का होईना, मी माझे स्वत:चे असे काम करीनच. आणीबाणीचा प्रसंग आल्यावर केवळ चार दिवसात, तिच्यात झालेला हा बदल कौतुकास्पद वाटतो. एकीकडे तिच्या मनात कुतुहलही असते की मंजुदादी एकटी रहाते कशी? मात्र मंजुदादी तिला ठामपणे सांगते की दारुडा नवरा व मुलाला किती काळ पोसत राहणार ? आणि इतके करुनही त्यांना ना काही कौतुक ना माझी काही किंमत, मग हवेत कशाला सोबतीला? आपण एकटे राहिलेले काय वाईट?


दुसरीकडे दिपकच्या घरी पोहोचलेली, अधिक स्मार्ट आणि शिकलेली पुष्पा, आलेल्या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल ह्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असते. मात्र परक्या घरात रहातांना तिथल्या बायकांशी तिची भावनिक जवळीक होते. पुष्पा एकदा कमळकाकडीच्या भाजीचे कौतुक करते, तर सासू आश्चर्याने म्हणते स्वयंपाकाची का कधी कोणी तारीफ करतं? मग खंतावून म्हणते माझी आईने केलेली ही भाजी मला खूपच आवडायची, पण नव-याला आणि मुलांना आवडत नाही म्हणून मीही खाणे सोडून दिले. आता मला काय आवडते हेच मला आठवत नाही. हीच सासू आपल्या सासूशी संवाद साधतांना म्हणते, नवीन घरी जातांना आपण सासू, सून, भावजय, जाऊ, वहिनी अशी नाती घेऊन जातो. त्याऐवजी मैत्रीचे नाते घेऊन गेलो तर? पुढे प्रांजळपणे विचारते की अम्मा, तुम्ही व्हाल का माझी मैत्रीण? 

एकदा पुष्पाला अनवधानाने, जावेने काढलेले तिच्या नव-याचे चित्र दिसते. जावेला मात्र त्याविषयी काहीच वेगळे वाटत नाही. त्यावेळी पुष्पा तिला जाणीव करुन देते, ही कला म्हणजे सरस्वतीचीच कॄपा. ती प्रत्येकावर होत नसते. इतकेच नाही तर प्रोत्साहन म्हणून तिला कागद, पेन्सिल आणून देते.


दारुडया नव-या बरोबर जाण्याचा नकार आणि जैवीक शेती शिकण्यासाठी देहरादूनला जाण्याचा पुष्पाचा निर्धार, इन्स्पेक्टर श्याम मनोहर, दिपक, गुंजन, सासरे ह्या सा-या पुरुषांसाठी आपले विचार बदलण्याचा क्षण असतो. आणि त्याचवेळी फूल आपल्या घरी पोहोचल्यावर छोटू, अब्दूल, रेल्वे कर्मचारी, स्टेशन  मास्टर, फूलने केलेला कलाकंद खाऊन साजरा करतात. स्त्री व पुरुषांच्या मनाचे विभिन्न कंगोरे आपल्या इथे बघायला मिळतात. 'लापता' झाल्यामुळेच फूल, पुष्पा, सासू, अम्मा, भाभी, मंजूदादी स्वतःच स्वतःला सापडतात. मंजूदादी म्हणते तसं एखादी गोष्ट आपल्या माहिती नाही, येत नाही ह्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. मात्र त्याविषयी कौतूक वाटून काहीच न करणे ही मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्यातून महत्त्वाचा संदेश काय तर स्त्री असो वा पुरुष, तुम्ही ठाम असाल तर कुणीही तुमच्यावर दबाव टाकू शकत नाही. ही ज्याची त्याची लढाई त्यालाच लढावी लागते आणि जिंकावी लागते.


- भाग्यश्री अनुराग केंगे


#lapataladies #aamirkhan #kiranrao #newlymarried #ravikishan #dulhan #ladies #hindimovies #netflixmovies #bollywood #gracefulwomen

Tuesday, September 27, 2022

हितगूज रखमा आणि आवलीचे

सर्वदूर कौतूक होणारे नाटक संगीत देवबाभळी (उशीराने का होईना) बघितले. अभिनय, संगीत, काव्य, लेखन आणि तांत्रिक बाजूतही अत्यंत उजवी असणारी ही कलाकृती मनाचा ठाव घेणारी आणि विचारात पाडणारी. विठ्ठलाची पत्नी रखूमाई आणि संत तुकारामांची बायको आवली ह्यांच्यातला संवाद आपल्याला त्यांच्या (आणि पर्यायाने स्त्रीच्या) अंतरंगात घेऊन जातो. साक्षात देवी आणि सामान्य स्त्री ह्यांच्यात समान ते काय? असे वरवर वाटू शकते, पण स्त्री म्हणून त्या दोघी समान पातळीवरच आहेत. रखमाई मोठी भासत असतांना अचानक आवली तिच्यासमोर उत्तुंग वाटते.


दोघींनाही आपल्या नव-याबद्दल रोष आहे. आवलीला तर नव-याबरोबरच विठ्ठूरायाबद्दलही तो अधिकच आहे. आवलीची व्यथा तिच्याच शब्दात सांगायची तर -
अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली
ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली
हात रंगल्याले, शेणाच्या रंगात,
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात
दारावर लोक येई, कसे माखले गं हात
सांगते मी शेण न्हाई, नवी मेंदीची ही जात

विठ्ठलाचा उल्लेख ती अत्यंत रागाने ’काळ्या’ म्ह्णून करते. संसाराचा भार एकटीलाच उचलावा लागत असल्याने तुकारामांपेक्षा व्यावहारीक असलेली आवली म्हणते, रागाने का होईना मी पण येताजाता ह्या काळ्याचे नाव घेतेच की. ह्याची दखल ’काळ्याला’ कधीतरी घ्यावीच लागणार आहे. आवलीच्या मनात रागाबरोबरच सततची भिती आहे. पोटात वाढणारे पोर, गळणारे छप्पर, पीठाचे रिकामे डबे, डोंगरावर जाऊन तल्लीन होणारा नवरा, पडणारा पाऊस आणि इंद्राणीचे (इंद्रायणी नदी) उसळणारे पाणी. ही तिची भिती खरी ठरते जेव्हा ती हजारो ’लिवलेले’ कागद नदीवर तरंगतांना पाहते. जणू तिचे घरच इंद्राणी धुवून नेते. आपल्या नव-याने लखूबाईला आई मानले आहे ह्यावर निर्धास्त होणारी आवली, लखूबाईने जरा वरचढपणा केल्यावर, "ह्यांनी आई म्हटलं, म्हणजे तुम्ही सासूपण करावंच का?" असे मिश्किलपणे थेट विचारणारी आवली आपल्याला सामान्य स्त्री भासते.
© भाग्यश्री अनुराग केंगे





आवलीचं हे असं जगणं मुश्किलीचं पण सरळसोपे आणि व्यावहारीक, तर रखमाई वेगळ्याच गुंत्यात अडकलेली. नव-यावर रुसून वेगळा गाभारा मांडणारी. आवलीचा बाभळीचा काटा स्वत: विठ्ठलाने काढावा आणि वर तिची काळजी घेण्यासाठी आपल्याला (लखूबाईच्या रुपात) थेट तिच्या घरी धाडावे म्हणूनही नव-यावर रागवणारी. आणि हो, हा राग आताचा नाही तर युगायुगांचा आहे. श्रीकृष्णाबरोबर राधेचे नाव घेतले जाते, रुक्मिणीचा उल्लेख तरी होतो का? मनात तिच्या इतका राग साचलेला की आवलीला ती दरडावून विचारते “अगं ये. पाऊस पहाय. शेवटची ठरवून कधी भिजलीस पावसात? देहभर श्वास भरून मोक्कळं कधी ओरडलीस शेवटचं? सकाळी आंगन झाडते तशा कपाळावरच्या आठ्या कमी कर, जर-तरच्या भिवया सैल सोड, कुनी कुनासाठी थांबलंय? कुनी कुनासाठी का थांबावं? करपायच्या आधी खरपूस झाल्या-झाल्या उलथाची भाकर, फोडणी तांबूस झाल्या-झाल्या ओतायची भाजी, उतू जाण्याच्या आधी उतरवायचं भांडं. का? कडेलोटाच्या क्षणापर्यन्त पोहचून परत माघारी का फिरायचं गं सारखं आपणच? एखादी भाकर करपून गेली, करपू दे. एखादा कढ उतू गेला, जाऊ दे. एखादी उकळी ओघळ झाली, हू दे. इतकी स्वत:ची तंद्री कधी लागली होती शेवटची? स्वत:त हरवल्याचा शेवटचा क्षण कोणता होता गं तुझा?”
© भाग्यश्री अनुराग केंगे

"एवढं टाळकुटं येडं केल्यात, म्हंजी आमचं येडं काहीतरी, शहानच लिवत आसलं ना" एवढा विश्वास आपल्या नव-यावर असलेली आवली सहजपणे रखमाईला समजावते, "असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये? घरावर रुसून निघून गेले, आनी परत यायची इच्छा झाली, तेव्हा घर जागेवर नसलं तर ? मानूस इसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई!" म्हणून म्हणते "पाऊस येवो न येवो, प्रत्येकानं आपआपल्या वाट्याचं नांगरत रहावं ... तुझ्या नांगरणीला पावसाशी बांधिलकी नाही, अन माझा पाऊस कुठंतरी दुसर्याच रानात कोसळतोय, हे तुला कधी कळायचं नाही. शेवटी आपलं आभाळ आपण बांधून हक्काचा पाऊस होता आलं पाहिजे.." अशी शहाणीव, आवली रखुमाईला सहज देऊन जाते.

आवली मधलं देवत्व आणि रखमाईतलं माणूसपण थेटपणे आपल्याला भिडते. ही किमया प्राजक्त देशमुखच्या लेखणीची आहे. आवली आणि रखमाईची ही देवबाभळीची खोल रुतणारी जखम आणि त्यांनीच त्यावर घातलेली फुंकर, अनुभवायलाच हवी अशी आहे.

© भाग्यश्री अनुराग केंगे

ओणम मैत्रीचा

तुमची लाडकी मैत्रीण तीन वर्षांनी तुमच्याकडे राहायला येते तेव्हा झालेला आनंद खाण्यातून व्यक्त करावा असे वाटले. गणपतीच्या दिवसातले गोड खाऊन कंटाळलेल्या तिला ओणमच्या निमित्ताने सद्या करूयात असे ठरवले, अर्थात मिनी रुपात. केरळच्या आठवणीतली खाद्यभ्रमंती आणि यु-ट्यूबच्या साहाय्याने पदार्थ निश्चित केले.

© भाग्यश्री अनुराग केंगे
 

पुली इनसी (आल्याचे लोणचे), नेल्लीक्का आचार (आवळ्याचे लोणचे), वेन्डकाय पचडी (भेंडीची कोशिंबीर) , थोरन (कोबीची भाजी stir फ्राय), ओळण (कोहळा आणि चवळी नारळाचे दूध घालून), कुटकरी (सुरण, कच्ची केळी आणि काळे चणे), श्रावण घेवडा (भरपूर ओला नारळ घालून), लेमन रस्सम, साधं वरण, भात, केळं, जिरे- कढीपत्ता घातलेले ताक आणि सोबतीला जिरे घालून गरम पाणी. मी माझ्या पध्द्तीने ह्यात बदल केले. थोरण मध्ये गाजरा ऐवजी सिमला मिरची घातली, कुटकरी मध्ये सुरणाऐवजी रताळी आणि कच्च्या ऐवजी पिकलेली केळी वापरली.
 

ओळण मध्ये कोहळ्या ऐवजी दुधी भोपळा वापरला. ह्यात आवडीपेक्षा ही त्यावेळेला उपलब्ध असलेल्या भाज्यांना झुकते माप दिले. अवियल करायची इच्छा होती, मात्र सगळ्या भाज्या जमवण्यात वेळ गेला असता. मला केळ्याचे वेफर्स, शक्करवराती आणि जेवणासाठी केळ्याची पानं आणून ठेवायला हवी होती. असो, पण झालेले पदार्थ चविष्ट झालेत ह्याची पावती मला मिळाली. खाण्याची मजा, मोठ्या आवाजात आरत्या आणि हातानी केलेल्या बाप्पाचे कौतूक. मैत्रीचा ओणम तर झोकात साजरा झाला.
© भाग्यश्री अनुराग केंगे
टीप - पदार्थाच्या उच्चारामध्ये आणि लिहिण्यामध्ये चूक होऊ शकते. चुकभुल देणे-घेणे 😊
© भाग्यश्री अनुराग केंगे

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...