Thursday, May 16, 2024

सापडलेल्या 'लापता' लेडीज

 सध्या भरपूर कौतूक होत असलेला आणि चर्चेत असलेला सिनेमा 'लापता लेडीज' पाहणे नितांत सुंदर अनुभव आहे. कलाकारांचे अभिनय सरस आहेतच पण त्यापेक्षा मला घडणारे विविध प्रसंग आणि त्या अनुषंगाने लिहिलेले संवाद अधिक लक्षात राहिले. सिनेमाची नायिका फूल, लग्न झाल्यावर पहिल्यांदाच घुंघट ओढते आणि चालतांना नेमकी ठेच लागते. त्यावर आईने लेकीला केलेली पहिली टिपण्णी अशी की आता सरळ बघून चालण्यापेक्षा मान खाली घालून चालायची सवय ठेव. रेल्वेत हुंडयावर चर्चा चालू असते, नव्या नव-या घुंघटच्या आडून मान खाली घालून फक्त ऐकत राहतात कारण परत घरचे संस्कार आणि समाजाचा दबाव. चुकामूक होऊन, फूल रेल्वे फलाटावरच हरवते तेव्हा घाबरुन जाते. मात्र त्याही परिस्थितीत ती रात्र स्त्री शौचालयात काढण्याचा सुज्ञपणा दाखवते.


रेल्वे स्टेशनवर तिची भेट होते, रागीट पण कणखर असणा-या मंजूदादीशी. अनेक पावसाळे पाहिलेली आणि पूर्वानुभवाने कर्मठ झालेली दादी फूलला ठामपणे सांगते की लग्न झाले, दोन दिवस एकत्र राहूनही झाले, दागिनेही देऊन झाले... आता तुझा नवरा परत येणे शक्यच नाही.  'भले घर की बेटीयॉं' ह्या नावाखाली समाजाची जी काही बंधने मुलींवर लादली जातात, त्याला तर मंजूदादी समाजाचा मोठा fraud म्हणते. परखडपणे तिला परिस्थितीची जाण देते की तुला तुझ्या आईने सगळे घरकाम शिकवले, त्यात हुशार केले पण बाहेरचे जगात कसे वावरायचे हे काही शिकवलेच नाही. फूल मात्र, त्याच घरकामाच्या जीवावर ठामपणे म्हणते की माझ्या आईने दुस-याच्या स्वयंपाकघरात ते आपले समजून काम करायला शिकवले आहे. त्यामुळेच फूल कलाकंद बनवून तिची पहिली कमाई तर करतेच आणि त्यामुळे आलेल्या विश्वासाने म्हणते की घरी गेल्यावरही छोटेसे का होईना, मी माझे स्वत:चे असे काम करीनच. आणीबाणीचा प्रसंग आल्यावर केवळ चार दिवसात, तिच्यात झालेला हा बदल कौतुकास्पद वाटतो. एकीकडे तिच्या मनात कुतुहलही असते की मंजुदादी एकटी रहाते कशी? मात्र मंजुदादी तिला ठामपणे सांगते की दारुडा नवरा व मुलाला किती काळ पोसत राहणार ? आणि इतके करुनही त्यांना ना काही कौतुक ना माझी काही किंमत, मग हवेत कशाला सोबतीला? आपण एकटे राहिलेले काय वाईट?


दुसरीकडे दिपकच्या घरी पोहोचलेली, अधिक स्मार्ट आणि शिकलेली पुष्पा, आलेल्या परिस्थितीतून कसे बाहेर पडता येईल ह्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असते. मात्र परक्या घरात रहातांना तिथल्या बायकांशी तिची भावनिक जवळीक होते. पुष्पा एकदा कमळकाकडीच्या भाजीचे कौतुक करते, तर सासू आश्चर्याने म्हणते स्वयंपाकाची का कधी कोणी तारीफ करतं? मग खंतावून म्हणते माझी आईने केलेली ही भाजी मला खूपच आवडायची, पण नव-याला आणि मुलांना आवडत नाही म्हणून मीही खाणे सोडून दिले. आता मला काय आवडते हेच मला आठवत नाही. हीच सासू आपल्या सासूशी संवाद साधतांना म्हणते, नवीन घरी जातांना आपण सासू, सून, भावजय, जाऊ, वहिनी अशी नाती घेऊन जातो. त्याऐवजी मैत्रीचे नाते घेऊन गेलो तर? पुढे प्रांजळपणे विचारते की अम्मा, तुम्ही व्हाल का माझी मैत्रीण? 

एकदा पुष्पाला अनवधानाने, जावेने काढलेले तिच्या नव-याचे चित्र दिसते. जावेला मात्र त्याविषयी काहीच वेगळे वाटत नाही. त्यावेळी पुष्पा तिला जाणीव करुन देते, ही कला म्हणजे सरस्वतीचीच कॄपा. ती प्रत्येकावर होत नसते. इतकेच नाही तर प्रोत्साहन म्हणून तिला कागद, पेन्सिल आणून देते.


दारुडया नव-या बरोबर जाण्याचा नकार आणि जैवीक शेती शिकण्यासाठी देहरादूनला जाण्याचा पुष्पाचा निर्धार, इन्स्पेक्टर श्याम मनोहर, दिपक, गुंजन, सासरे ह्या सा-या पुरुषांसाठी आपले विचार बदलण्याचा क्षण असतो. आणि त्याचवेळी फूल आपल्या घरी पोहोचल्यावर छोटू, अब्दूल, रेल्वे कर्मचारी, स्टेशन  मास्टर, फूलने केलेला कलाकंद खाऊन साजरा करतात. स्त्री व पुरुषांच्या मनाचे विभिन्न कंगोरे आपल्या इथे बघायला मिळतात. 'लापता' झाल्यामुळेच फूल, पुष्पा, सासू, अम्मा, भाभी, मंजूदादी स्वतःच स्वतःला सापडतात. मंजूदादी म्हणते तसं एखादी गोष्ट आपल्या माहिती नाही, येत नाही ह्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. मात्र त्याविषयी कौतूक वाटून काहीच न करणे ही मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्यातून महत्त्वाचा संदेश काय तर स्त्री असो वा पुरुष, तुम्ही ठाम असाल तर कुणीही तुमच्यावर दबाव टाकू शकत नाही. ही ज्याची त्याची लढाई त्यालाच लढावी लागते आणि जिंकावी लागते.


- भाग्यश्री अनुराग केंगे


#lapataladies #aamirkhan #kiranrao #newlymarried #ravikishan #dulhan #ladies #hindimovies #netflixmovies #bollywood #gracefulwomen

No comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...