मुलं मोठी होताएत तशी भरपूर गाणी ऐकतायेत ! अर्थातच टिव्ही, रेडिओ आणि इंटरनेटवर, मात्र फक्त नवीन चित्रपटांची. नाही म्ह्णायला, मी दुपारी विविध भारती ऐकते किंवा रात्री कधीतरी 'मस्ती' चॅनलवर जुनी गाणी बघते तेव्हां त्यांच्या कानावर ती पडत असतात. सहज एकदा दुपारी मी माझे अत्यंत आवडते, गीता दतने गायलेले "मुझे जां ना कहो मेरी जां" ऐकत होते. लेक माझ्या शेजारी मोबाईलमध्ये मग्न होती. मात्र अचानक म्हणाली "आई, ही गायिका कोण गं ? आणि ह्या गाण्यात तर काहीच म्यूझिक नाही, तरी किती छान वाटतयं". मी उत्साहात तनुजाचा 'अनुभव' चा व्हिडियो दाखवला. खूष झाली.
काही दिवसांनी... रात्रीचं जेवण झाल्यावर गॅलरीत बसायला गेले तर रात्रीच्या शांततेत लेक "मुझे जां ना कहो मेरी जां" ऐकण्यात रमली होती. इतका आनंद झाला ! गाण्यांवर गप्पा झाल्या तर म्ह्टली चित्र काढतांना त्यांच्या क्लासमध्ये रोज शास्त्रीय लावतात तेव्हा झोपच येते (कधी कधी असं होतं खर) मात्र 'कट्यार'ची सगळीच गाणी आवडतात. हे ऐकून खूप बरं वाटलंच आणि ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. त्या दिवशी रात्री 'सावन' वर मुलांना, आईचे आवडते आणि बाबाचे आवडते असे करत, अशी अनेक रागांमधली, विविध संगीतकारांची अर्थपूर्ण गाणी ऐकवली. त्यातली काही पुढीलप्रमाणे -
१) ये दिल और उनकी निगाहों के साये
२) एक मिठीसी चुभन, ठंडीसी अगन
३) सारा प्यार तुम्हारा मैंने बांध लिया है आंचल में
४) फिर छिडी रात, रात फूलों की
५) ये मैनें कसम ली, ये तुने कसम ली
६) आकाशसे उसपार भी आकाश है
७) जादू है जुनून है, कैसी माया है
८) झिर झिर बरसे सावनी अखियां, सांवरिया घर आं
९) ए री पवन, ढूंढे किसे तेरा मन
१०) साथी कितनी खूबसुरत ये तसवीर है
११) जीवन की बगिया महकेगी
१२) न जाने क्या हुआ, जो तुने छू लिया
मुलांबरोबरची ही संगीत मैफल आम्हीही मनापासून अनुभवली. फारसं काही न सांगता मुलांना संगीत आणि गायकीमधला सुक्ष्म बद्ल अनुभवता आला.
जसं की "सारा प्यार तुम्हाला" मध्ये पार्श्वसंगीत वेगळे मात्र त्यावर किशोर व आशा भोसले समांतर गात आहेत. "ये कैसी माया है" आणि "आकाश के उस पार भी" ही दोन्हीं गाणी ह्र्द्यनाथ मंगेशकरांची खास शैली असणारी. त्यातला लता मंगेशकरांचा आवाजही सारखाच. मात्र तो आवाज "एक मिठीसी अगन" आणि " ए री पवन" मध्ये किती तरी वेगळा. "ये मैनें कसम ली" मध्ये सायकलच्या घंटीचा संगीतासाठी वापर. "सांवरिया घर आ" आणि " बोले रे पपिहरा" एकाच रागात बांधल्यामुळे बरीचशी सारखी वाटतात. अशी बरीचशी माहिती मुलं बाबाकडून ऐकत होती. माझे लक्ष कायमच गाण्याच्या शब्दांकडे असल्यामुळे "मुझे घेरे लेते है, निगाहो हे साये" किंवा "आकाशसे उसपार भी आकाश है" समजावून सांगतांना मलाही नव्याने त्यातली आशयघनता जाणवली. अशी ही आमची कौटूंबिक मैफल अगदी रात्री उशीरापर्यंत रंगली. सिनेसंगीतातली अशी अजून कित्येक अवीट गाणी आहे बघूयात परत ही मैफल कधी जमते. मुलांनी परत म्हणेपर्यंत आम्ही वाट बघतोय.
No comments:
Post a Comment