Tuesday, November 26, 2019

तमाम सुठ्ठो थै...

शाळेच्या मधल्या सुट्टीत डबे उघडले की कोकी, मिठ्ठो लोलो, सेयल डबल, तरयाल पटेटा, साबुदाने, चावल, चौली असे एक से एक सिंधी पदार्थ रोज मला चाखायला  मिळायचे आणि सोबतीला सिंधी पापड असायचाच. काही खास दिवस असला की सिंधी कढी आणि सेंवीया ही आवर्जून मिळायचे. रोजच्या माझ्या चित्तपावनी डब्याला  भरपूर तेल आणि वेगळे मसाले असलेला हा बदल खूपच आवडायचा. झुलेलाल जयंती, नानकजी जयंती, चेट्री चन्ड्र ह्या खास दिवशी मिळणारी गोड बुंदी आणि बारीक शेवेचा प्रसाद मैत्रिणी आवर्जून दुस-या दिवशी आणायच्या.

फेरवानी, आसवानी, परीयानी, पंजवानी, हेमनानी, सचदेव, कुकरेजा, आहुजा, भाटिया ही सगळी मित्रमंडळी
माझ्या नावाचा भागेशीरी (भाग्यश्री) प्रांन्जपे(परांजपे) असा मजेशीर पण प्रेमाने उच्चार करायचे. सतत सिंधी ऐकून ब-यापैकी सिंधीही समजायला लागली. मैत्रिणींच्या घरी गेल्यावर वेगळेपणा जाणवायचा. माझी आजी कायम नऊवारीत पण ह्यांच्या आज्या मात्र पांढ-या शुभ्र सिल्कच्या पंजाबी ड्रेसमधे असायच्या. गळ्यात सोन्याची ठसठशीत चेन आणि झुलेलालचे लॉकेट, हातात बांगड्या आणि कानात हि-याच्या किंवा खड्याच्या कुडया. मैत्रिणींच्या आयाही खूपच टापटीप असायच्या. एकूणच लक्षात यायचे की ह्यांची कपड्यांची आवड थोडी भडकपणाकडे झुकणारी आहे. नोकरपेश्या घरातून आलेल्या मला मैत्रिणींच्या वडिलांच्या ’बिझनेस’ चे अप्रुप वाटायचे. शाळेतल्या नोकरी करणा-या प्रत्येकालाच मी जोडधंदा करतांना पाहिलेले आहे. दुकान, एलाआईसी एजंट, जमिनीचे व्यवहार असे काही ना काहीतरी असायचेच. ह्या आपल्या कामात इतर सिंधी बांधवांनाही ते सहज सामावून घ्यायचे. भरपूर मेहनत करायचे. एकूणच अभ्यासापेक्षा व्यवहारीक ज्ञानाकडे मुलांनाही जास्त प्रोत्साहन द्यायचे.

असो... माझे हे लिखाण वाचून मैत्रिण हसून पटकन म्हणेल, "मुई, चरी आईन छा?"

.... तर माझ्या ह्या सिंधी मैत्रांमुळे मी त्यांचे काही पदार्थ आवर्जून करतेच. त्यातलाच आज केलेला सेयल डबल किंवा सेयल पाव! खाल्ल्यावर घरांच्या चेह-यावरचे समाधान पाहून मनात म्हटले - तमाम सुठ्ठो थै!


- भाग्यश्री केंगे
टीप : वरील निरीक्षणं माझ्या वैयक्तिक अनुभवातून लिहिलेले आहेत. ह्यात मतमतांतर असू शकतात.



No comments:

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...