Saturday, June 20, 2020

अनावश्यक ते अत्यावश्यक व्हाया कोरोना

कोरोना विषाणूने अवघ्या जगात थैमान मांडले आहे. जागतिक पातळीवर आणि देश पातळीवर त्यासोबत
लढण्यासाठी अविरत प्रयत्न चालू झाले आणि त्यातूनच आला हा लॉकडाऊन. एका विशिष्ट लयीत चाललेले आपले आयुष्य एकदम खीळ लागल्यागत थंडावले. सुरुवातीला पहिला आठवडा सक्तीने का होईना, सगळे घरी होते - अगदी ब्रेकफास्टपासून रात्री झोपेपर्यंत. ह्या आनंदात घरोघरच्या सुगरणी सुखावल्या. मुलांच्या, नवरोबांच्या फर्माइशी पूर्ण करण्याचा त्यांनी जणू चंगच बांधला. त्यामुळे डालगोना कॉफी, बनाना आईसक्रीम, पाव, रुमाली खाकरा, दहीवडे ट्रेंडींग झाले. व्हॉटसअ‍प स्टेटस, इन्स्टा स्टोरीज आणि फेसबुक पोस्टवर ह्या पदार्थांचे फोटो मानाने अवतरले. यथावकाश "रोज काय नवीन करायचे बाई?", हा आयांचा प्रश्न आपल्या कोरोना प्रश्नापेक्षाही मोठा झाला. दर वीकएण्डला बाहेरच जेवायचे, अशी आपली संस्कृती बनल्यामुळे गृहिणींनी यु-ट्यूबला शरण जात अनेक आधुनिक पदार्थांची (थोडक्यात हॉटेलमधील) घरी करण्याची शर्थ पार पाडली. सोशल मिडियावर फोटो टाकायचे असल्याने पदार्थाची सजावट, टेबलाची मांडणीही आकर्षक व्हायला लागली. मात्र लॉकडाऊन जसजसा वाढत गेला, तसा भाजी किंवा वाणसामान मिळणे थोडे कठीण व्हायला लागले, तसा हा पदार्थांचा फॅन्सीनेस थोडा कमी झाला. गृहिणींसकट घरच्यांनाही आपले नेहमीचे जेवण आवडू लागले. मुख्य म्हणजे बाहेरचे न खाताही आपल्या आनंदाने जेवता येते आणि पोटही भरते, ह्या साक्षात्कार अनेकांना, विशेषत: मुलांना झाला. भरीसभर वाढदिवस, लग्न वाढदिवसही घरच्या घरीच साधेपणाने व आनंदाने साजरे झाले.
आपली आई-बायको किती काम करते, हे अनेकांना प्रत्यक्ष बघायला मिळाले. घरच्या मदतनीसांना सुट्टी असल्याने ते ही काम वाढलेलेच. आया जर वर्क फ्रॉम होम असतील तर हे काम आता तिहेरी झालेले. त्यामुळे अनेकांकडे मुलांनी, नव-यांनी सफाई कामे आनंदाने स्वीकारली. झाडू, भांडी ते पाककलेतली प्रगती अशा सोशल पोस्ट वाढल्या. एकामुळे दुसरा प्रोत्साहित होऊन एकूणच समाजाची मानसिकता बदलायला हातभार लागला. मात्र हा बदल किती वेळ टिकतो हे काळच ठरवेल. पण महत्त्वाचे हे की घराघरातून सहकार्याची भावना वाढीला लागली. त्याचे पडसाद समाजातही उमटले. अनेकजण मास्क बांधून गरजूंना शिधा/अन्न वाटपासाठी रस्त्यावर उतरले. ज्यांना प्रत्यक्ष शक्य नव्हते त्यांनी आर्थिक मदत पुरवली.

लॉक डाऊनच्या काळात पुरेसा वेळ हाताशी असल्याने अनेकांमधले सुप्त गुण जागे झाले. अनेकांमधले लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार, वीणकाम, भरतकाम, बागकाम... आपली कलाकृती सोशल मिडीयावर पेश करून वाहवा मिळवू लागले. ह्यात सिने/टिव्ही कलाकार ही मागे नव्हते. अनेकांनी स्वतःचे युट्यूब चॅनलवर vlogs करुन आपले फॅन फॉलोवर्स वाढवले. सामान्य प्रेक्षकांबरोबर गाणी गाऊन गायकांनी व्हिडीयो प्रकाशित केले. नृत्य व योगावाल्यांनीही एकमेकांना टॅग करत कलाकृती सादर केल्या. तुम्ही कुठल्याही ठिकाणी असा, प्रत्येकाने स्वतःचा व्हिडिओ शूट करुन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकसंध बांधायचा आणि पेश करायचा. त्यामुळे प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले. टिव्हीपेक्षाही इंटरनेट हे संपर्काचे आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाले. त्यामुळे सोशल मिडीयावर ’चॅलेंज’फारच बोकाळले, जसे फिर मुस्कुरायेगा इंडिया, सिक्स पॅक चॅलेंज, साडी चॅलेंज, जोडी चॅलेंज, पुस्तक
चॅलेंज, सिनेमा चॅलेंज, पाककृती चॅलेंज ...वगैरे. आता हे फोटो टाकून आपल्या दहा मित्रमैत्रिणींना टॅग करायचे, मग ते पुढच्या दहांना करणार. अश्या पध्दतीने ही साखळी पुढे वाढत राहते. ह्यात ज्ञान कमी, मनोरंजन भरपूर आणि वेळ पटकन जायला लागला. वेळ जायला आणि मनोरंजनाला हॉट स्टार, अ‍ॅमेझॉन प्राईम, एमएक्स प्लेयर, नेट फ्लिक्सच्या बरोबरीने केबल टिव्ही आणि युट्यूब आहेतच. आधीच्या पिढीने जुने सिनेमे पाहिले तर तरुण प्रेक्षकांकरता वेबसिरीज, शॉर्ट फ्लिम्सचा सागर समोर आहे. किती बघाल? थकून जाल! पण ह्या चित्रकृती संपणार नाहीत. बींज वॉच (Binge watch)ची नवी क्रेझ आली आहे. चित्रकृतींचे सगळेच्या सगळे भाग एका बसणीत बघून टाकायचे. वेळही भरपूर आणि वाटही बघायला नको! अनेकांना फक्त घरच्यांबरोबर काय वेळ घालवायचा म्हणून मग नातेवाईकांशी, शाळा, कॉलेजसोबतींशी ऑनलाईन गप्पा वाढल्या, ऑनलाईन खेळ खेळता यायला लागले. झूम, गुगल हॅंगआऊट ह्यांचा वापर भरपूर वाढला आणि आभासी जगातही माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे हे दिसून आले.

होता होता एका महिन्यात ऑफिसचे काम घरुन करणा-या मोठयांच्या बरोबरीने तरुणांचा व लहानांचा स्क्रीन टाईम नकळत वाढला. ऑनलाईन शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळे कोर्सेस जाहीर केले. सर्टीफिकेटचेही महत्व पटवून दिले. दहावी-बारावीचे क्लासेसवालेही ऑनलाईन क्लासरुमचे सर्मथन करायला लागले. युट्यूबर्स शिक्षकही पुढे सरसावले. आता तर शाळा आणि कॉलेजेसनी आपले वर्गच झूम आणि गुगल क्लासरुममध्ये भरवायला सुरुवात केल्याने विद्यार्थांना वही-पेनपेक्षा ही संगणक-मोबाईल आणि डेटा कनेक्शन अत्यावश्यक झाले आहे. त्याच्याशिवाय रोजचा अभ्यास पूर्ण कसा व्हायचा? खालच्या स्तरांवरच्या विद्यार्थांचे काय? खेडयांमध्ये वीज नसते त्यांचे काय? असे अनेक प्रश्न मनात येतातच. पण सध्यातरी पांढरपेशा घरातली मुलं ऑनलाईन अभ्यास करत आहेत, खरं तर असं त्यांच्या पालकांना वाटते. मात्र ऑनलाईनची ही वाट इतकी निसरडी की माऊसने अभ्यासाव्यतिरीक्त दुस-या टॅबमध्ये भलतेच काही उघडायचे नाही, हे पूर्णत: त्या विद्यार्थ्यावरच अवलंबून आहे. कारण पालकांना हे समजायला, स्क्रीनवर लक्ष ठेवायला ते आपल्या मुलांइतके नक्कीच स्मार्ट नाहीत. ऑफिसचे काम करतांनाही हेच लक्षात असायला हवे. टीम वेगवेगळ्या ठीकाणी बसलेली असतांना, आठ-दहा तास काम करुनही हवी असलेली प्रॉडक्टीव्हिटी मिळत नाही अशी कंपन्यांची ओरड आहे.

कोरोनामुळे आर्थिक मंदी आलेलीच आहे. बेरोजगारी आणि पगारातही कपात आहे. मात्र आर्थिक क्षेत्रातील अनेकांनी contingency fundsचे महत्व अधोरेखीत केले. वैयक्तिक असो अथवा व्यावसायिक, दोन्हीकडे ही आपत्कालीन रक्कम ज्यांनी राखीव ठेवली होती त्यांना फारसा त्रास झाला नाही. अनेकांना त्याची गरज पटली आहे. काही सुज्ञ गुंतवणूकदारांनी म्युच्युवल फंड आणि इक्विटीत गुंतवणूक वाढवली. २००८ सालच्या मंदीच्या काळात घाबरलेले गुंतवणूकदार आता मात्र समजदारीने वागले आहेत. ह्यात इन्शूरन्स कंपन्याही मागे नाहीत. ते प्रत्येकाला हेल्थ इन्शूरन्स व्हिथ करोनाचे महत्व सांगताहेत, टर्म प्लान घ्यायला सांगताहेत. हे असले तरी सामान्य माणसाला Spend less, Save more ह्या तत्वावर चालणे शहाणपणाचे ठरणार आहे. ह्यासाठी आपल्या आधीच्या जीवनशैलीपेक्षा अजून किती साधेपणा आणता येईल, अनावश्यक खरेदी कशी टाळता येईल हे बघायला हवे. लॉकडाऊनच्या काळात केवळ काही जोड कपडयांचे सहज पुरतात, चपलांचे एकच जोड पुरतात, गाडी नाही चालवली तर बिघडत नाही, बाहेर खाल्ले नाही तरी चालते, ह्या आणि अश्या रोजच्या राहाणीमानातल्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला सहज कळल्या आहेत. खरंतर consumerism कमी करुन साधे आणि शाश्वत जगण्याकडे वाटचाल कोरोनाने करुन दिली आहे. ही वाट आता अर्धवट सोडता कामा नये, कारण त्यामूळे तरी वसुंधरेवरचा भार थोडा कमी होईल आणि पुढच्या कित्येक पिढ्या अधिक आरोग्यपूर्ण आणि आनंदी जगू शकतील.

- भाग्यश्री केंगे
bhagyashree@cyberedge.co.in

सदर लेख पालकनीती (पुणे) ह्या मासिकात प्रकाशित झाला आहे.

#COVID 19 #Corona #StayHome #Staysafe #Corona Maharashtra

Saturday, May 30, 2020

अच्छे तो हो दिलबर जान...

रविवारची संध्याकाळ! दुस-या दिवशी दहावीचा इतिहासाचा पेपर असल्याने मला अभ्यास संपवायची घाई होती कारण सहा वाजता दूरदर्शनवर ’सागर’ लागणार होता...

मग कधीतरी नसीर-शबानाचा ’मासूम’ पाहतांना... छोटी आराधना जोरजोरात "ओम शांती ओम..." म्हणतांना आई रागावून टिव्ही बंद करते.  ऑफिसमधून दमून आलेल्या नसीरला आराधना तक्रार करते की "पापा, ममा मुझे चिंटूमामा के गाने देखने नहीं दे रही". चिंटू मामा हे नाव भारीच आवडलं मला. असा हा ऋषी कपूर मधून मधून भेटत होताच.

पण मला पहिल्यांदा तो आवडला चांदनी मध्ये! सिनेमा अर्थातच श्रीदेवीचा होता. मात्र "मेहबूबा..." अशी बिनधास्त
आरोळी ठोकत आपल्या प्रेयसीला दिल्ली शहर घुमवणारा आणि उत्तरार्धात केवळ प्रेयसीसाठी अपंगावर मात
करण्यासाठी तगमगणारा रोहित त्याने खासच उभा केला होता. पण तरीही लक्षात राहिले विविध स्वेटर्समधले त्याचे लाभस रुप. चांदनीत ऋषी आवडल्याने त्याचे जुने सिनेमेही पहायचे ठरवले. दूरदर्शनच्या कृपेने खेल खेल में, रफू चक्कर, बॉबी, मेरा नाम जोकर वगैरे पाहिले. त्यातली गाणी अप्रतिम होतीच, पण मला ऋषी इतका भावला नाही. मग ’ये वादा रहा’ पाहिला आणि ऋषी माझा आवडता नट झाला, कायमचाच! त्याच दशकात मागे पुढे आलेले कभी-कभी, कर्ज, जमाने को दिखाना है, दीदार-ए-यार, प्रेम रोग, दूसरा आदमी, बडे दिलवाला, सितमगर, सागर, नसीब अपना अपना ... ह्या सिनेमातून तो आवडतच गेला.


अभिनय तर चांगलाच असायचा मात्र नृत्यातली सहजता, लीप सिन्कींग, गाण्यावरचा मुद्राभिनय अफलातून
असायचा.  ऋषीला अनेकदा स्टेजवरुन नाच-गाणी (सिनेमात) करायची संधी मिळाली. ओम शांती ओम, बचना ए हसिनो, हम तो आपके दिवाने है, आ मिल जा मैफिल है तेरे कदमों मे, हमने तुमको देखां, परदा है परदा, दिल लेना खेल है दिलदार का, सोचेंगे तुम्हे प्यार करें के नही... ह्या सगळ्या गाण्यांत ऋषीने नृत्याच्या सहज हालचाली
आणि प्रचंड उर्जेने संपूर्ण स्टेज व्यापून टाकले आहे.  गाण्यात जर वाद्ये जसे की डफली, गिटार, व्हायोलिन, ट्रम्पेट, पियानो, बासरी वगैरे वाजवायची असतील तर त्याचा चपलख अभिनय करायचा तो ऋषीच! जणू त्याला ही वाद्ये उपजतच वाजवता येतात. ऋषीचे नृत्य म्हणजे हातापायाच्या आणि चेह-याच्या सहज हालचाली. त्यात कुठेही कवायत नसायची. त्यामुळे गाण्यात कितीही गोड अभिनेत्री किंवा नृत्यांगना असली तरी ऋषी लक्ष वेधून घ्यायचा. आठवा गाणी... मौसम प्यार का, तेरी इसी अदा पे सनम, दर्द ए दिल, रंग भरे बादल से, चंद रोज और मेरी जा चंद रोज, ऐसा कभी हुआ नहीं, कहीं ना जा... यादी मोठी आहे.

आपल्या चॉकलेट बॉय इमेजला हटकून नकारात्मक छटा असणा-या भूमिकाही ऋषीने आवर्जून केल्या. खोज, बोल राधा बोल आणि अगदी अलीकडचा अग्नीपथ. दोन किंवा जास्त नायक असणा-या सिनेमातही तो
सहनायकासमोर तोडीसतोड उभा रहायचा. अमिताभ बरोबर अमर, अकबर, अ‍ॅंथनी, नसीब, कुली, अजूबा, १०२ नॉट आऊट, विनोद खन्नाबरोबर चांदनी, कमल हसन बरोबर सागर, नाना पाटेकर बरोबर हम दोनो, दीदार-ए-यार मध्ये जितेंद्र, अनिल कपूरबरोबर विजय... असे कितीतरी चित्रपट. ९० च्या दशकात कौटूंबिक सिनेमांची लाट
होती, त्यामुळे अनेक नायक/नायिका एकाच चित्रपटात असायचे. ऋषीने घराना, घर घर कहानी, बडे घर की बेटी, पराया घर, घर परिवार, अमिरी-गरीबी, साजन का घर अश्या सिनेमातही कामं केली आहेतच की. नायिका प्रधान चित्रपटातही ओव्हरपॉवर न होता ऋषी आपला आब राखून असायचा, एक चादर मैलिसीमध्ये हेमा मालिनीचा दीर ते नवरा हा त्याचा मानसिक प्रवास लाजवाब. कसक मध्ये दुखावलेला नवरा रंगवतांना नीलमपेक्षा ऋषीच जास्त लक्षात रहातो, दूसरा आदमी मध्ये राखीसमोर तो आत्मविश्वासपूर्ण उभा राहिलाय, प्रेमरोगमध्ये प्रेयसीचे दु:ख समजून घेणारा मित्र तर आपली बायको बरोबर असूनही आपल्याला तिला साथ देता येत नाही ह्याची खंत त्याने दामिनीत तितक्याच ताकदीने दाखवली आहे.


तरुण चेह-याची देणगी लाभल्याने चाळिशी ओलांडूनही नवीन नायिकांबरोबर भूमिका ऋषीने केल्यात, जसे साहिबा (माधुरी दीक्षित), दरार (जूही चावला), पहला पहला प्यार (तब्बू), श्रीमान आशिक (उर्मिला मातोंडकर), साजन की बाहोंमे (रवीना टंडन), बडे घर की बेटी (मिनाक्षी शेषाद्री), दिवाना (दिव्या भारती), अनमोल (मनिषा कोईराला). काळाची पावलं ओळखून मग मात्र त्याने आपल्या वयाला साजेश्या भूमिका केल्या. लव्ह आज कल, फना, नमस्ते लंडन, लक बाय चान्स, दिल्ली - ६, प्यार मे ट्विस्ट, दो दुनी चार... वगैरे, मात्र त्यातही वैविध्य होते. स्टुडंट ऑफ द इयर मध्ये वेगळा शिक्षक, बेवकुफियॉं मधला वैतागलेला सासरा, बेशरम मधला पोलिस, हाऊसफुल्लची २ ची कॉमेडी असे वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट केले. त्यानंतर आपल्या वयापेक्षा मोठया म्हणजे म्हाता-यांच्या भूमिकाही त्याने कपूर अ‍ॅन्ड सन्स, १०२ नॉट आऊट मध्ये वठवल्या.

दोन नायिकांबरोबर मात्र त्याने तारुण्यात आणि म्हातारपणातही नायकच रंगवला. नीतू सिंग बरोबर तो खेल खेल में, रफू चक्कर, झूठा कहींका मध्ये अल्लड तरुण नायक होता तर दो दुनी चार मध्ये मध्यमवयीन नायक. ह्या मधला मध्यमवर्गीय पंजाबी शिक्षक दुग्गल सर ऋषीने खूपच प्रभावी उभा केला. त्याने डिंपल कपाडियाबरोबर बॉबीने कारकिर्दीची सुरुवात केली, मध्यम वयात सागर केला आणि प्रौढ वयात प्यार में ट्विस्ट ! ह्या तिन्ही चित्रपटांत, वेगवेगळ्या दशकात, ऋषी डिंपलचा नायकच होता. मोटर सायकलवर फिरतांना, खुल्लम खुल्ला ह्या रिमिक्स गाण्यावर दोघांना नाचतांना बघून प्रेक्षक आपल्या ह्या नायकाचे वयच विसरले.


सतत काम करणे, आलेल्या कामात आपल्यातील बेस्ट देणे त्यामुळेच बदलत्या काळाशी ऋषी जमवून घेऊ शकला आणि त्याच्या चाहत्यांना विविध भूमिका बघायला मिळाल्या. चार दशकं चित्रपटसृष्टीत घालवल्यामुळे प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांत त्याचे चाहते आहेत. माझ्यासाठी मात्र ऋषी अजून ८० ते ९०च्या दशकातलाच आहे. देखणा, लोभस, किशोरच्या (क्वचित रफी किंवा शैलेंद्र) आवाजातल्या गाण्यांमधून भेटणारा. त्याने आता आपल्या प्रवासाची वाटच बदलली म्हणून विचारावेसे वाटते, "कहो कैसे रस्ता भूल पडे ? अच्छे तो हो दिलबर जान!"



- भाग्यश्री केंगे
bhagyashree@cyberedge.co.in
सदर लेख हा पूर्णत:हा वैयक्तिक मतांवर आधारीत आहे.

Monday, May 18, 2020

सांदण

जरी कोकणस्थ असले तरी आमचे कोकणात घर नसल्याने कोकणच्या गावात राहण्याचा अनुभव नाही. मात्र अनेकवेळा कोकणात आडबाजूच्या गावांमध्ये ’होम स्टे’ चा अनुभव घेतला आहे आणि तो प्रत्येकवेळी अविस्मरणीयच ठरला आहे. नारळी पोफळीच्या सानिध्यात होम स्टेच्या घरात राहतांना, तिथल्या साध्या पण सकस पदार्थांची चव अजूनही जिभेवर आहेच. उकडीचे मोदक, घावन घाटलं, निवग-या, तांदूळाच्या भाकरी, फणसाची भाजी, ओल्यानारळाची चटणी, तक्कू, सोलकढी आणि सांदण. आज अचानक सांदण करुयात असं (व्यायाम करतांना) मनात आलं. सांदण - हे त्याचे नाव आणि रंग दोन्ही मोहक आहेत. तांदूळाचा रवा होताच, नारळाच्या दुधाऐवजी साधं दूध घातलं, चवीनुसार साखर घातली, आंब्याचा रस घातला आणि थोडंस मुरु दिल. इथे खरंतर थोड जास्त मुरु द्यायला हवं होत मात्र मला ऑफिसच्या कामाला सुरुवात करायची असल्याने शक्य नव्हतं. मग चिमूटभर बेकींग पावडर घालून छान वाफवून घेतलं. अहाहा... साजूक तुपाबरोबर सांदणामुळे आजच्या ब्रेकफास्ट रंगतदार झाला.

सांदण
मात्र त्यापेक्षाही लेकीने काढलेला हा नेटका आणि कल्पक फोटो मनाला अधिक भावला !!

- भाग्यश्री केंगे

छायाचित्र : मृण्मयी केंगे
#marathiworld #gracefulwomen #foodphotography #foodblogging #marathirecipes

Saturday, January 25, 2020

वारीची संतुष्टी

दरवर्षी आषाढात होणारी पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याचप्रमाणे पौषात येणा-या त्र्यंबकेश्वरच्या
निवृत्तीनाथमहाराजांच्या वारीचीही परंपरा आहे. आपला धाकटा बंधू संत ज्ञानेश्वराने आळंदी येथे समाधी घेतल्यावर, थोरल्या निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. षटतिला एकादशीला निवृत्तीनाथ  महाराजांच्या समाधीवर डोके टेकायला महाराष्ट्रातून हजारो वारकरी लांबचे अंतर, पायी चालत येतात. एकादशी जशी जवळ येते तसे काही वारकरी शहरी रस्त्यांवर दिसायला लागतात. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावर भजनाच्या गजरात झ्रेंडे फडकवत पालखी घेऊन दिंडया चाललेल्या असतात.

आम्हीही ह्या वर्षी वारीच्या मुक्कामी त्यांच्यात शामील झालो. पारंपारीक वेशात यायला सांगितल्याने नऊवारी, नथ वगैरे मराठी दागिने असा सगळा नटापट्टा करुन तेथे पोहोचले. अश्याच वेशात काही उत्साही सख्याही आल्या होत्या."अगं किती गोड दिसतेस! किती छान दिसतेस! नवी पैठणी का?", "नऊवारी स्वत: नेसलीस? मी तर बाई शिवूनच घेतली!", "तुझे ’अहो’ ही पारंपारीक वेशात छान दिसतायेत, नाहीतर आमचे ’हे’, नेहमीसारखेच आलेत" ...असे अनेक संवाद कानावर पडत, हास्यविनोद करत काहीश्या अप्रूपाने (कपड्यांच्या) शहरी लोकं एकमेकांना भेटत होती.


माझे लक्ष मंडपात गेले तर काही माळकरी स्त्रिया व पुरुष भजनं म्हणण्यात दंग होते. राधाकॄष्णाची भजने चालू होती आणि सारेजण आजूबाजूचे भान विसरुन हरी नामात दंग झाले होते. त्यांना आमच्या (शहरी लोकांच्या) येण्याने काहीही फरक पडला नव्हता. मग सा-यांनी मिळून मोठे रिंगण तयार केले. बायकांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, कळश्या आणि पुरुषांनी गळ्यात झांजा घालून फेर धरला. विठूच्या गजरात, संथ लयीत, प्रत्येकाने हाता-पायाचा ठेका धरला. जे नवखे होते, ते माळक-यांकडे पाहून आपला ताल नीट करत होते. हळूहळू ठेक्याची लय वाढत गेली तशी हातापायांची गती वाढली. सर्वांच्या चेह-यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. आता स्त्री आणि पुरुषांनी वेगवेगळी रिंगणं तयार केली. पुरुषांनी गिरक्या घेऊन एका लयीत फेर धरला तर इकडे स्त्रियांनीही आपल्या नाचाचा वेग वाढवला. मग सगळ्यांनी मनसोक्त फुगड्या घातल्या. गावाकडच्या मावश्या प्रत्येक शहरी बायकांना आग्रहाने आणि उत्साहाने सामील करुन घेत होत्या.

मला कौतूक सगळ्या गावच्या बायकांचे वाटत होते. त्या सगळ्याजणी (छोट्या, तरुण आणि वयस्कर) सारख्याच उत्साहाने नाचत होत्या, रिंगणात उंच उडया मारत होत्या, फुगडया घालत होत्या, मोठया झांजा वाजवत होत्या, गाणी म्हणत होत्या आणि भजनातही रंगून जात होत्या. दोन-चार फेर धरल्यावर शहरी बायका बसायला खूर्ची (खाली बसवत नव्हते!) शोधत होत्या. आजच्या भाषेत ’कार्डियो’ आणि ’स्ट्रेन्थ ट्रेनिंग’ दोन्हीही पुरेसे होऊन ही ’रीलॅक्सेशनची’ गरज पडत नव्हती. ह्यांची ’फ्लेगझीब्लिटी’ आणि ’एनर्जी’ मात्र अखंड टिकून होती. ’हॅप्पी होर्मोन्सचे’ हेच अतिशय समर्पक उदाहरण आहे असेच वाटले मला.

त्यांचा वेष अत्यंत साधा आणि रोजचा असला तरी त्यांना त्याचा अजिबात न्यूनगंड नव्हता. ठसठशीत कुंकू किंवा बुक्का लावल्याने प्रत्येकीचा चेहरा उजळला होता. भरपूर नाचून झाल्यावर दुपारी सर्वांची पंगत बसली. सुखद गारव्यात पत्रावळीवर वाढलेला साधं-वरण भात आणि बटाटयाची भाजी खाऊन सर्वांनी तृप्तीची ढेकर दिली. साधे जेवण पण त्या सा-या वातावरणात सुग्रास वाटले.





मनात आले किती ही संतुष्टता, आहे त्या परिस्थितीत भरपूर आनंद घ्यायचा आणि दुसरयांनाही द्यायचा. कुठेही एकमेकांशी स्पर्धा नाही, आपल्याला आवडेल, रुचेल त्या आवाजात विठ्ठलाची भजनं म्हणायची आणि आपल्याच तालात नाचायचे. शेजारच्याशी तुलना नाही, कमी लेखणं तर नाहीच त्याउलट ’माऊली’ म्हणत पाया पडायचे. शारिरीक कष्ट भरपूर त्यामुळे प्रत्येकाची अंगकाठी सडसडीत परिणामी शहरी आजारांशी सामाना नाही.

 शेतात खरं तर रब्बी पिकांची कामं असणार, मात्र तरी वेळ जमवून उत्साहाने सगळे वारकरी वारीत सामील झाले होते. १०-१५ दिवसांपासून चालत, भजनं म्हणत आणि आपल्या सवंगडयांशी सुख-दुःखाच्या गुजगोष्टी करत आता अगदी त्यांच्या मुक्कामाजवळ येऊन ठेपले होते. मुक्काम (destination) उद्देश असला तरी हा जो सारा प्रवास (journey) आहे तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा. ह्या प्रवासात वर्षभराची उर्जा साठवून ते शेतीच्या कामांना परत जुंपतात. त्यांचा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्याने बेभरवशाचा, मात्र तरीही निर्सगाला साक्षी ठेवूनच ते हा प्र्वास करतात. ह्या काळात थंडीही भरपूर असते, दिवस छोटा असतो मात्र ह्यांचा उत्साह मात्र खूप मोठा! एकदा एकादशीला दर्शन झाले की प्रत्येकाला आपल्या गावी पोहोचायची ओढ असते. मिळेल त्या वाहनाने वारकरी परतात मात्र त्यांच्या चेह-यावर ’काय वैताग’ हा भाव नसतो. अगदी म्हाता-या आजीबाई सुध्दा आनंदाने ट्रकच्या टपावर बसून जातात. काही उभ्याने जातात. जातांना असते चेहरयावर पसरलेली तृप्ती, ठरवलं ते साध्य केल्याचे समाधान व आशा असते पुढच्या वर्षी परत येण्याची.


आणि आपल्या ह्या लेकरांकडे पालखीतले निवॄत्तीमहाराज मात्र कौतूकाने बघत असतात...

- भाग्यश्री केंगे


फोटो - अनुराग केंगे

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...