सर्वदूर कौतूक होणारे नाटक संगीत देवबाभळी (उशीराने का होईना) बघितले. अभिनय, संगीत, काव्य, लेखन आणि तांत्रिक बाजूतही अत्यंत उजवी असणारी ही कलाकृती मनाचा ठाव घेणारी आणि विचारात पाडणारी. विठ्ठलाची पत्नी रखूमाई आणि संत तुकारामांची बायको आवली ह्यांच्यातला संवाद आपल्याला त्यांच्या (आणि पर्यायाने स्त्रीच्या) अंतरंगात घेऊन जातो. साक्षात देवी आणि सामान्य स्त्री ह्यांच्यात समान ते काय? असे वरवर वाटू शकते, पण स्त्री म्हणून त्या दोघी समान पातळीवरच आहेत. रखमाई मोठी भासत असतांना अचानक आवली तिच्यासमोर उत्तुंग वाटते.
दोघींनाही आपल्या नव-याबद्दल रोष आहे. आवलीला तर नव-याबरोबरच विठ्ठूरायाबद्दलही तो अधिकच आहे. आवलीची व्यथा तिच्याच शब्दात सांगायची तर -
अंधाराला अंधाराला, दिशा नाही मेली
ठेचकळ्या आभाळाला, मलमपट्टी केली
हात रंगल्याले, शेणाच्या रंगात,
कपिलेचा गंध येतो माझ्याही अंगात
दारावर लोक येई, कसे माखले गं हात
सांगते मी शेण न्हाई, नवी मेंदीची ही जात
विठ्ठलाचा उल्लेख ती अत्यंत रागाने ’काळ्या’ म्ह्णून करते. संसाराचा भार एकटीलाच उचलावा लागत असल्याने तुकारामांपेक्षा व्यावहारीक असलेली आवली म्हणते, रागाने का होईना मी पण येताजाता ह्या काळ्याचे नाव घेतेच की. ह्याची दखल ’काळ्याला’ कधीतरी घ्यावीच लागणार आहे. आवलीच्या मनात रागाबरोबरच सततची भिती आहे. पोटात वाढणारे पोर, गळणारे छप्पर, पीठाचे रिकामे डबे, डोंगरावर जाऊन तल्लीन होणारा नवरा, पडणारा पाऊस आणि इंद्राणीचे (इंद्रायणी नदी) उसळणारे पाणी. ही तिची भिती खरी ठरते जेव्हा ती हजारो ’लिवलेले’ कागद नदीवर तरंगतांना पाहते. जणू तिचे घरच इंद्राणी धुवून नेते. आपल्या नव-याने लखूबाईला आई मानले आहे ह्यावर निर्धास्त होणारी आवली, लखूबाईने जरा वरचढपणा केल्यावर, "ह्यांनी आई म्हटलं, म्हणजे तुम्ही सासूपण करावंच का?" असे मिश्किलपणे थेट विचारणारी आवली आपल्याला सामान्य स्त्री भासते.
© भाग्यश्री अनुराग केंगे
आवलीचं हे असं जगणं मुश्किलीचं पण सरळसोपे आणि व्यावहारीक, तर रखमाई वेगळ्याच गुंत्यात अडकलेली. नव-यावर रुसून वेगळा गाभारा मांडणारी. आवलीचा बाभळीचा काटा स्वत: विठ्ठलाने काढावा आणि वर तिची काळजी घेण्यासाठी आपल्याला (लखूबाईच्या रुपात) थेट तिच्या घरी धाडावे म्हणूनही नव-यावर रागवणारी. आणि हो, हा राग आताचा नाही तर युगायुगांचा आहे. श्रीकृष्णाबरोबर राधेचे नाव घेतले जाते, रुक्मिणीचा उल्लेख तरी होतो का? मनात तिच्या इतका राग साचलेला की आवलीला ती दरडावून विचारते “अगं ये. पाऊस पहाय. शेवटची ठरवून कधी भिजलीस पावसात? देहभर श्वास भरून मोक्कळं कधी ओरडलीस शेवटचं? सकाळी आंगन झाडते तशा कपाळावरच्या आठ्या कमी कर, जर-तरच्या भिवया सैल सोड, कुनी कुनासाठी थांबलंय? कुनी कुनासाठी का थांबावं? करपायच्या आधी खरपूस झाल्या-झाल्या उलथाची भाकर, फोडणी तांबूस झाल्या-झाल्या ओतायची भाजी, उतू जाण्याच्या आधी उतरवायचं भांडं. का? कडेलोटाच्या क्षणापर्यन्त पोहचून परत माघारी का फिरायचं गं सारखं आपणच? एखादी भाकर करपून गेली, करपू दे. एखादा कढ उतू गेला, जाऊ दे. एखादी उकळी ओघळ झाली, हू दे. इतकी स्वत:ची तंद्री कधी लागली होती शेवटची? स्वत:त हरवल्याचा शेवटचा क्षण कोणता होता गं तुझा?”
© भाग्यश्री अनुराग केंगे
"एवढं टाळकुटं येडं केल्यात, म्हंजी आमचं येडं काहीतरी, शहानच लिवत आसलं ना" एवढा विश्वास आपल्या नव-यावर असलेली आवली सहजपणे रखमाईला समजावते, "असं रुसल्यावर सोडून जायचं असतं व्हय बये? घरावर रुसून निघून गेले, आनी परत यायची इच्छा झाली, तेव्हा घर जागेवर नसलं तर ? मानूस इसरून जाईल इतका अबोला बरा न्हाई आई!" म्हणून म्हणते "पाऊस येवो न येवो, प्रत्येकानं आपआपल्या वाट्याचं नांगरत रहावं ... तुझ्या नांगरणीला पावसाशी बांधिलकी नाही, अन माझा पाऊस कुठंतरी दुसर्याच रानात कोसळतोय, हे तुला कधी कळायचं नाही. शेवटी आपलं आभाळ आपण बांधून हक्काचा पाऊस होता आलं पाहिजे.." अशी शहाणीव, आवली रखुमाईला सहज देऊन जाते.
आवली मधलं देवत्व आणि रखमाईतलं माणूसपण थेटपणे आपल्याला भिडते. ही किमया प्राजक्त देशमुखच्या लेखणीची आहे. आवली आणि रखमाईची ही देवबाभळीची खोल रुतणारी जखम आणि त्यांनीच त्यावर घातलेली फुंकर, अनुभवायलाच हवी अशी आहे.
© भाग्यश्री अनुराग केंगे