'दिल बाग़ बाग़ हो जाता है'
रोजच्या व्यस्त वेळापत्रकात, आपल्या घराजवळ असणारे पार्क किंवा बागा, जॉगींग ट्रक हे सुकून देणारे असतात. गर्द झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि मखमली हिरवळ आपल्याला आजूबाजूच्या गाडयांचे हॉर्न आणि प्रदुषणापासून काही काळ का होईना दिलासा देतात. लहानपणी रोज संध्याकाळी घराजवळ असलेल्या बागेत खेळायला जाणे ह्यासारखा मोठा आनंद नव्हता. घसरगुंडी, सी-सॉ, चक्री आणि झोका ह्यावर मुलांची सतत चढाओढ आणि भांडणे ही व्हायची. कधीतरी एखादयाची आई मध्ये पडून आपल्याच सोन्याला झोका आधी मिळावा म्हणून अधिकाराने झोका घ्यायची तेव्हा इतर मुलांना आलेला राग अगदी तोंडावर दिसायचा. त्याचबरोबर सुरु व्हायची हिरवळीवर पकडापकडी, आंधळी कोशिंबीर किंवा डबा ऐसपैस सारखे खेळ. भरपूर आरडाओरडा, दंगामस्ती करत हे खेळ अगदी दिवेलागणीपर्यंत खेळून मगच घरी परतायचे. रविवारचा दिवस म्हणजे घरापासून थोडया दूर असणा-या, शिवाजी बागेत (आधीचे जॅक्सन गार्डन) जाण्याचा. ह्या बागेतली खेळणी आणखीनच वेगळी, जास्तीची आणि मोठी होती. त्यामुळे गर्दीही खूप. पण प्रत्येक खेळण्यावर खेळून झालेच पाहिजे हे ठरवून आल्यामुळे गर्दीचे काहीच वाटायचे नाही. त्यानंतर हिरवळीवर खेळ खेळायचो तेव्हा मोठी माणसे गप्पा मारत किंवा पुस्तक, वर्तमानपत्र वाचत बसलेली असायची. काहीजणं तर चक्क झोप काढत. प्रेमी युगुलांकडे चोरुन बघतांना आमच्यातल्या काही 'समजदार' मुलांमध्ये खुसपुस व्हायची. बागेत विविध गर्द मोठी झाडे, फुलझाडे आणि कारंजा असल्याने थंडावा असायचा. © भाग्यश्री अनुराग केंगे
अश्यातच बागेबाहेरच्या रामभरोसेकडून पुडीत बांधून आणलेली, कांदा-कैरी टाकलेली चटकदार भेळ समोर आली की समस्त मंडळी त्यावर तुटून पडायची. कधीतरी उसाचा रसही असायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजणांची डबापार्टी असायची. रोजचेच जेवण पण बागेत जेवतांना दोन घास जास्तच जायचे. अश्यावेळी घरातली मोठी माणसेही लहान मुलांबरोबर त्यांच्या वयाचे होऊन खेळायची. तर अशीही बागेतली संध्याकाळ म्हणजे जणू छोटी सहलच असायची, पुढच्या आठवडयाच्या धावपळीसाठी सज्ज होण्यासाठी. © भाग्यश्री अनुराग केंगे
अमेरीकेत फिरतांना भले मोठे पार्क पाहून थक्क व्हायला होते. हे पार्क आजूबाजूला राहणा-या लोकांच्या जीवनाचा
महत्त्वाचा भाग असतात. बाळांना स्ट्रोलरमध्ये घेऊन फिरणा-या तरुण आया, स्केटबोर्ड-सायकल चालवणारी, क्रिकेट-फुटबॉल खेळणारी शाळकारी मुले, गप्पा मारत बसलेले ज्येष्ठ नागरीक, किटी पार्टी करणा-या बायका, गिटार वाजवत बसलेला तरुण, कुठेतरी कोणाचा वाढदिवस साजरा होतोय तर काही ठिकाणी तरुण त्याच्या प्रेयसीला गुडघ्यावर बसून प्रपोज करतोय... अशी दृष्ये फेरफटका मारतांना सहज दिसतात.
Town-planning करतांना अशी मोकळी जागा खास नागरीकांसाठी राखीव असतेच. मोठमोठया घरात जाणवणारा एकटेपणा ह्या पार्कमध्ये आल्यावर नक्कीच पळून जात असणार. म्हणूनच हे पार्क कायम गजबजलेले असतात विशेष:ता त्यांच्या 'समर डेज' मध्ये. आपल्याकडे लोकसंख्या जास्त, इमारती उंच, वाढते शहरीकरण, मग मोकळ्या जागा राहणारच कश्या? आणि आता तर बागेतल्या थंडाव्यापेक्षा मॉलमधला वातानुकुलीत थंड चकचकीतपणा मनाला अधिक मोह घालतो. © भाग्यश्री अनुराग केंगे
अगदी ८०च्या दशकांपर्यंत अनेक चित्रपटातही बाग असायचीच. अनेक प्रसंग विशेषत: गाणी बागेत चित्रित व्हायची. पटकन आठवणारी गाणी बघा -
हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक, कोई बता दे दिल हैं जहां, ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, जाने कैसा हैं मेरा दिवाना, चल चमेली बाग में, तेरा फूलों जैसा रंग, ओ मनचली कहां चली, अच्छा तो हम चलते हैं, देखो मैंने देखा एक सपना, जानेमन तुम कमाल करते हो, गापुची गापुची गम गम, प्यार का दर्द हैं मिठा मिठा, सारे गम पप - गारे रे मेरे संग मेरे साजना.... ही यादी लांबत जाणारी आहे! अश्या अनेक गाण्यांमधून काश्मिरची निशाद बाग, शालिमार बाग, ट्युलिप गार्डन, मैसूरचे वृंदावन गार्डन, मुंबईतली छोटा काश्मिर बाग, राणीची बाग आपल्याला सहज ओळखू येतात.
बागेत फेरफटका म्हणजे पंचमहाभूतांशी तुम्ही सहज कनेक्ट होता. आजकाल लाईफ कोच होलिस्टिक आणि माईंडफूल जगण्यावर भर देतात. बागेत हे सहज साधले जाते. आणि माझ्या मनातले हिंदीत सांगायचे तर 'दिल बाग़ बाग़ हो जाता है।'
- भाग्यश्री अनुराग केंगे
छायाचित्र सहाय्य - अनुराग केंगे
#mondaymotivation #positivethoughts #positivevibes
#gardens #parks #gracefulwoman #Nashik #Shivajigarden #tulipgarden #Vridawangardenmysuru