Monday, December 5, 2016

मिसळ आणि स्वातंत्र्य





मैत्रिणींबरोबर सहजच गप्पा मारायला किंवा बाहेर जेवायला जाणं आजच्या शहरी स्त्रियांना काही विशेष वाटत नाही. अगदी छोटया गावातही कॉलेजच्या तरुणी आणि विवाहीत युवतीही असे स्वातंत्र्य उपभोगत असतात. ह्या स्वातंत्र्याचा स्वीकार आपल्या मनाने इतका सहज केलेला असतो की आपल्याला त्याचे फारसे काही अप्रूप वाटत नाही. मात्र गेल्या आठवडयात मला ह्या स्वातंत्र्याने नक्कीच विचारात पाडलं. माझी  एक पारंपारीक सुखवस्तू घरातली मैत्रिण एके दिवशी सहज बोलता बोलता म्हणाली की तिने अजून बाहेरची (हॉटेलमधली) मिसळ तिथेच बसून खाललेली नाही. मला जवळ जवळ चक्कर यायची बाकी होती. कारण आमच्या शहरात एक से एक मिसळीची ठिकाणं आहेत. त्याविषयी खवय्ये अनेक ब्लॉग्स आणि व्हॉसअ‍ॅपवर भरभरुन कौतूक करतच असतात. बाहेरगावाहून आलेला पाहुण्यांना हमखास मिसळीचा झणझणीत नाश्ता ठरलेलाच असतो. असो...

तर माझ्या ह्या मैत्रिणीचे घर अगदी पारंपारीक आहे. जेवणाच्या वेळा ठराविक. रोजचं जेवणही साग्रसंगीत दोन भाज्या, कोशिंबीर, वरण-भात आणि जेवायला बसल्यावर गरम फुलके. जेवण दोन्ही वेळेला ताजं आणि गरमच वाढल पाहिजे हा नियम. त्यामुळे स्वयंपाकाची वेळ झाली की माझ्या ह्या मैत्रिणीची घालमेल होते. असेल तिथून ती थेट घराकडे धाव घेते. मी कित्येकदा तिला समजावून सांगितले की अगं मग करुन येत जा नं. त्यावर हिचं लाडिक उत्तर की अगं नव-याला आणि मुलाला मीच वाढायला हवं असतं. स्वतःच्या हातानेच काय, सासूबाईंकडून सुध्दा वाढून घेत नाही. तिच्या ह्या कौतूकाच्या बोलण्यावर मी कपाळावर हात मारुन घेतला ( आणि मनात माझ्या नव-याला पाठीवर कौतुकाची थाप दिली. कारण आमच्याकडे बरोबर उलटी परीस्थिती, मी थांबायचं म्हटलं की नवरा आणि मुलं एकसुरात म्हणणार आम्ही मॅनेज करु गं, तू जा !) मात्र माझ्या इतक्या कर्तव्यदक्ष मैत्रिणीला मिसळसारख्या साध्या गोष्टीचा आनंद मिळू नये ह्याची फार खंत वाटली.

गेल्या आठवडयात ह्याच मैत्रिणीचा वाढदिवस झाला. आदल्या दिवशी मी तिला फोन केला की बरोबर आठ वाजता मी तूला घ्यायला येईन आणि मग आपण मिसळ खायला जाणार आहोत. ऐकल्यावर आनंदाने तिचा विश्वासच बसेना मात्र तिच्यातल्या कर्तव्यदक्ष गृहिणीने लगेच डोकंवर काढलं. अगं, कसं जमेल मला इतक्या सकाळी. घरची आवराआवरी आणि मुख्य म्हणजे नव-याराला बाहेर पडण्याआधी आणि मुलाच्या क्लासच्या आधी माझा स्वयंपाक दहापर्यंत तयार हवा. बरीच कारणं द्यायला लागल्यावर, मी शेवटी तिला धमकी दिली की मी थेट तिच्या नव-यालाच ह्याबद्दल सुनवेन आणि घेऊन जाईन. हा उपाय बरोबर लागू पडला. दुस-या दिवशी छानशी तयार होऊन ती माझी वाटच बघत होती. खूपच आनंदात होती म्हणत होती अगं सासूबाई अगदी आश्चर्याने बघत राहिल्या, नव-याने थोडी मदत केली आणि मुलगा तर आग्रहाने तयार व्हायला मदत करत होता. आम्ही माझ्या आवडत्या हॉटेलात जाऊन मनसोक्त गप्पा मारत झणझणीत मिसळ हाणली. मैत्रिण तिनं उचलेल्या ह्या पावलाने अगदी हरकून केली होती. ’स्वतःसाठी आवडीचं करणं’ हीच खरी वाढदिवसाची भेट हेच सारख सांगत होती. अगदी छोटयाछोटया गोष्टीतलं स्वातंत्र्य आपल्याला आत्मविश्वास देतं, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ?

छायाचित्र - इंटरनेट

Saturday, November 26, 2016

बदलते (तंत्र)ज्ञान

फेसबुक स्टेट्स अपडेट्स, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन मनी ट्रान्सफर, अमेरिकेतल्या मुलाशी स्काईप... ही आणि अशी अनेक वाक्य आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आहेत. खरंतर हा बदल तसा अलिकडचा, मात्र झपाटयाने झालेला. संगणक, इंटरनेट आणि आता स्मार्ट मोबाईल फोन्समुळे ही क्रांती शक्य झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत नवीन पिढी लगेच करतेच मात्र त्याची उपयुक्तता लक्षात आलेली मागची पिढीही (साधारण ६०-७० वयोमानाची) ऑनलाईन बॅंकींग, सोशल संकेतस्थळ, व्हॉटसअ‍ॅप अतिशय आत्मविश्वासाने हाताळते आहे. ही ख-या अर्थाने तंत्रज्ञानाची क्रांती आहे.

भारतात इंटरनेटचा वापर साधारणपणे १९९४ साली सुरु झाला. त्याच दरम्यान आम्हीही आमच्या घरी (मुंबईत VSNL मध्ये अर्ज करुन) इंटरनेट कनेक्शन घेतले. त्यावेळेला 'एक्सटर्नल मॉडेम’ वापरात होता. नेटवरच्या वेबसाईट्सही फक्त माहिती किंवा चित्रांसह दिसायच्या. हे सगळे फोन वरुन डायलिंग असल्यामुळे बहुतेकवेळा बील आटोक्यात रहाण्यासाठी चित्र बंद ठेऊन माहितीच वाचली जायची, आणि हो, STD डायलिंग असल्यामुळे बहुतेक वेळा कामही रात्री ११ नंतर करणे फायद्याचे होते. अगदी निकड असेल तर आम्ही रविवारी मुंबईला फक्त नेट सर्फींगसाठी सुध्दा जायचो. त्याच वेळेला निश्चित केले होते की आता हेच आपले कार्यक्षेत्र असणार आहे. त्यादृष्टीने अभ्यास, माहिती गोळा करुन डिसेंबर १९९७ मध्ये आम्ही नाशिकची पहिली वेबसाईट www.nashik.com उभी केली. फेब्रुवारी २००० मध्ये मराठी दिनाच्या दिवशी भारतातली पहिली मराठी वेबसाईट www.marathiworld.com चालू केली. त्यावेळी ही घटना नाशिककरांसाठी नवीन आणि थोडीशी न समजण्याचीच होती पण परदेशात असलेले नाशिककर तसेच जगभरातील मराठी माणसांनी मात्र आमचे भरभरुन कौतूक केले.

अमेरीकेत इंटरनेटचा शोध आणि वापर १९८१ साली सुरु झाला. तेव्हा फक्त लष्करी सेवेसाठी उपलब्ध असलेली ही सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. १९९१ मध्ये World Wide Web सुरु झाल्यावर इंटरनेटची लोकप्रियता वाढायला लागली. ह्याचे मुख्य कारण होते की लोकांना रंगीत स्वरुपात विविध माहिती, छायाचित्रं आणि चलचित्रांसकट वाचता येत होती. त्यावेळी फक्त इंग्रजीत असणारी, अल्पसंखेत असणारी संकेतस्थळं आजच्या घडीला विविध भाषेत ८००,०००,००० पेक्षाही जास्त आहेत. मातृभाषेत माहितीची देवाणघेवाण उपलब्ध झाल्यामुळे अल्पशिक्षितही ह्या तंत्रज्ञानाचा लाभ घेतांना दिसतात. माहिती व्यतिरिक्त इतरही सेवा देण्यात याव्या ह्या उद्देशाने १९९५ साली Amazon.com ही वस्तू खरेदी-विक्रीची वेबसाईट अमेरिकेत सुरु झाली. तेव्हा क्रेडीट-डेबिट कार्ड पध्दत आपल्याकडे नसल्याने भारतात त्याची फारशी लोकप्रियता नव्हती. १९९६ साली भारतीय तरुण सबीर भाटियाने इंटरनेटवर Hotmail ही मोफत इमेल सेवा सुरु केली. काही क्षणात जगाच्या कानाकोप-यात, अत्यंत कमी किंमतीत, संपर्क साधता येणारी ही इ-मेल सेवा मायक्रोसॉफ्ट कंपनीने ’काहीशे’ कोटी डॉलर्सना विकत घेतली. एका भारतीयाच्या ह्या तांत्रिक क्रांतीमुळे तरुणांना अमेरिकेत सॉफ्टवेअर्सच्या संधी उपलब्ध झाल्या. अनेक मोठ्या कंपन्याही आपले बस्तान भारतात बसवू पाहात होत्या.

त्याचवेळेला १९९८ साली गुगलने आपले सर्च इंजिन आणले. फक्त इंग्रजीत आपली सेवा देणारे हे सर्च इंजिन अल्पावधितच प्रत्येक भाषेमध्ये सेवा देऊ लागले आणि इंटरनेटवरच्या महाकाय माहितीपर्यंत एका चुकटीसरशी पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे गुगल अर्थातच इतके लोकप्रिय झाले की, आज एखादी माहिती शोधायची असल्यास ” अहो, गुगल करा नां !” असा शब्द प्रयोग वापरात आला. गुगलमुळे इंटरनेटवरचे बिझिनेस मॉडेल बदलले. गुगल अ‍ॅनालिटिक्स आणि गुगल अ‍ॅडसेन्सद्वारे इंटरनेटवर जाहिरातींच्या सहाय्याने पैसे कमावता येऊ लागले. त्यामुळे संकेतस्थळांच्या बरोबरीने ब्लॉग्सचा जन्म झाला.

२००४ साली हे तंत्रज्ञानाचे वारे इतके सैराट सुटले कारण एव्हाना फेसबुकचा जन्म झालेला होता. सुरुवातीला साधारण वाटणारे हे बाळ आता चांगलेच तरुण झाले आहे. लोकप्रियता तर इतकी आहे की एकवेळ तुमचे आधारकार्ड नसेल मात्र फेसबुक अकाऊंट हवं असं तरुणाईचं मत आहे. आपलं हे ऑनलाईन रुप बहुतेकजण साजिरं ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. तुमच्या व्यवसायाचे संकेतस्थळ असले तरीही त्या कंपनीचे फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. फेसबुक वापरायला इतकं सोप्प की कंपनीच्या वॉचमनपासून बॉसपर्यंत सगळेच ’फ्रेन्ड’ यादीत मोडतात. फेसबुकचे हात धरुन पाठोपाठ गुगल प्लस, व्टिटर, युट्यूब, लिंक्ड इन, पीइंटरेस्ट, पिकासा, इन्स्टाग्राम अवतरले. ही सगळी संकेतस्थळं खास सोशलानेटवर्कींटसाठीच आहेत मात्र प्रत्येकाचा आशय आणि उद्देश वेगवेगळा. त्यामुळे आजच्या घडीला तुम्ही ह्यांचे सभासद नसाल तर तुमचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.

सोशल नेटवर्कींगच्या बरोबरीने संकेतस्थळांच्या तंत्रज्ञानातही खूप प्रगती झाली. पूर्वी फक्त माहितीसाठी मर्यादीत असलेली संकेतस्थळ आता सॉफ्टवेअरच्या बरोबरीने काम करतात. त्यामुळेच तर तुम्ही ऑनलाईन बॅंकीग, ऑनलाईन रेल्वे आरक्षण, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन पासपोर्ट, आधारकार्ड, सातबारा अश्या आणि इतर जीवनाशी निगडीत गोष्टी ह्या संकेतस्थळांवर करु शकता. तंत्रज्ञानाने अजून एक पाऊल पुढे टाकत ह्या सर्व गोष्टी ’अ‍ॅप’ द्वारा आपल्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्मार्ट फोनवर कमी किंमतीत संपर्काची क्रांती केली व्हॉटअ‍ॅपने. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटअ‍ॅपची ताकद फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गने ओळखली आणि चक्क १९ बिलियन डॉलर्सला ही कंपनी विकत घेतली. सातत्याने नवीन फीचर्स आणणा-या ह्या तंत्राचे रोज १ मिलियन नवीन सभासद येतात. नुकत्याच आलेल्या ’आभासी तंत्रज्ञानाने’ विकसित केलेल्या ’पोकेमान गो’ ह्या खेळाने जगाला वेड लावले आहे. ह्या तंत्रात संगणकाने तयार केलेल्या प्रतिमा वास्तव जगात उमटवल्या जातात.


इंटरनेटच्या ह्या सेवा तुम्ही विनासायास घेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे उत्तम वेगाचे इंटरनेट असेल आणि संगणक किंवा फोन अद्यावत असेल तर. दर काही महिन्यांने नवीन येणारे संगणक किंवा फोनचे तंत्रज्ञान आपण वाचत असतोच. मोठे स्क्रीन्स, जास्त वेगाच्या प्रोसेसर चिप्स आता बाजारात आहेत. आता USB तर 256 GB इतक्या क्षमतेतही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे VSNL ते JIO हा इंटरनेट वेगाचा प्रवासही थक्क करणारा. पूर्वी अर्ज करुन प्रतिक्षे नंतर मिळणारे इंटरनेट कनेक्शन आज मात्र ब्रॉड बॅण्डचा रुपात जवळच्या टेलिफोन ऑफिसमधून विकत घेता येते. जोडणी नंतर केबलच्या सहाय्याने आपल्या संगणकावर इंटरनेट अवतरते. टेलिफोन लाईन आपल्या घरात नको असल्यास 2G/3G/4G मोबाईल फोन नेटवर्क द्वारे इंटरनेट मिळू शकते.   तुमच्या इंटरनेट्ची क्वालिटी किंवा मोबाईल ब्रॉडबॅण्ड सिग्नल हा तुमच्या 3G/4G मोबाईलच्या सिग्नलवर अवलंबून असतो. आजच्या काळात हे तंत्रज्ञान खूपच चलती असणारे आहे. फायबर ऑप्टीक्स हे ब्रॉड बॅण्डचे आणखी एक अतिशय नवीन असे तंत्र. परंतु त्यांची सेवा थोडी मर्यादीत व महाग आहे कारण ब-याचश्या कंपन्यांचे केबल किंवा वायर टाकण्याचे काम चालू आहे. नुकत्याच आलेल्या JIO ने तर क्रांतीच केली आहे. Voice over Long Term Evolution (VoLTE) चे तंत्र वापरुन जियोने बोलण्याचे तंत्र सुस्पष्ट तर केलेच पण त्याच बरोबर voice आणि data एकाच वेळेला अतिशय चांगल्या वेगाने वापरायची सोय ग्राहकांना दिली. अतिशय कमी दरात ही सेवा देत असल्याने कमी कालावधीत जियोचे लाखो ग्राहक आहेत.

तंत्रज्ञानाने कमी कालावधीत अनेक उपयुक्त गोष्टी आपल्यापुढे आणल्या. ज्या प्रगतीसाठी उपयुक्त आहेत. मात्र त्याचे दुष्परिणामही आहेत. आज तंत्रज्ञानाने पिढीचे अंतर कमी केले इतके की दर दहा वर्षात पिढी बदलते. आजच्या पिढीत नवीन जन्माला आलेल्या बाळाची ओळख कॅमेरा फोनशी आधी होते आणि मग वास्तव जगाशी. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. हा माहितीचा अल्लादिनचा राक्षस असल्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही सहजपणे ताबा मिळवू शकतो. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर करतांना तुम्हाला सातत्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सदर लेख महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रसिध्द झाला आहे

Friday, November 11, 2016

कोकण मेवा

कोकणात दोन-चार वेळा जाणे झाले होते तरी खास आंब्याचा मोसम अनुभवला नव्हता. मग रत्नागिरी हापूस चाखण्यासाठी त्याच जिल्ह्यातली केळशी, वेळास आणि आंजर्ले ही ठिकाणे निश्चित केली. कोकणात निसर्ग आणि त्याला धरुन तेथील माणसांचे साधे जीवन ह्याचा आपल्याला पावलोपावली अनुभव येतो. रस्त्याने प्रवास करतांना वैशाख वणवा जाणवत होता तरी गुलमोहोरांचे फुललेले ताटवे डोळ्यांना सुखद गारवा देत होते. जागोजागी फुललेली कुडाची पांढरी फुले आणि त्यांचा मंद असा गोडसर वास. तोडल्यावर मात्र हाताला चीक लागत होता.


वाटेत माणगांवात वडघर नावाचे छोटे गाव लागते. साधारण २ किमी कच्च्या रस्त्याने आत गेल्या साने गुरुजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. अतिशय सुरेख बांधलेली ही वास्तू तर आहेच त्याच बरोबर साने गुरुजींचे जीवनचरित्र उलगडून दाखवले आहे. ’श्यामची आई’ वाले साने गुरुजी किती ’मोठे’ होते हे मुलांना नक्कीच दाखवण्यासारखे आहे.

 साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक

 साने गुरुजींचे हस्ताक्षर

 प्रिय जन्मभूमी 
कोकणाता शिरतांना सावित्री नदी आपले स्वागत करते. अतिशय विस्तीर्ण पात्र आणि स्वच्छ पाणी. सध्या पाणी टंचाई हे क्षणभर विसरायलाच झाले

सावित्रीनदीचे विस्तीर्ण पात्र
निसर्गाने कोकणाला फळफळावळ अगदी उदार हस्ते बहाल केली आहे. उन्हाची तहान तहान होत असतांना करवंदांची जाळी आपले लक्ष वेधून घेतात. काळी टपोरी रसरशीत करवंदे तोडण्याचा मोह न झाला तरच नवल. ही रानमैना तोडतांना हातांना खरचटले तरी पर्वा नाही ! कॅलशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन अ नी युक्त असं हे छोटंस फळ रक्तक्षयातही उपयुक्त आहे. आणि हो माझ्या शहरी मनाने केलीली आणखीन एक नोंद म्हणजे रस्त्यावरची ही करवंद पूर्णत: सेंद्रीय आहेत. त्यामुळे आम्ही मनसोक्त ताव मारला !


रस्त्याच्या कडेकडेने दिसणारे काजूचे फळ ही पण निसर्गाचीच देणगी. पेरच्या आकाराचे (पेर बरोबर तुलना केली कारण शहरात हे फळ जास्त परिचयाचे आहे) आणि त्याला चिकटलेली काजूची बी. दिसायला खूप लोभसवाणे. ही झाडे मात्र जंगलात आणि रस्त्याच्या कडेनेच आढळतात. मात्र  इथे काजू उद्योगही कमी आढळले. मात्र ओल्या काजूची उसळ हा तिथला खास मेन्यू. आम्ही मात्र काजूफळ/गर चोखून खाल्ला. काही ठिकाणी ह्याचे सरबतही केले जाते.






नारळ, फणस आणि सुपारीविषयी काय सांगावे. संपूर्ण कोकणात वाडयामधून ह्याची लागवड केली जाते. कोकणी माणसाचे आर्थिक गणितच ह्यावर अवलंबून आहे. आपल्या सारख्यांना मात्र फणसाने भरलेले झाडं, नारळाच्या झावळ्या आणि पिवळ्या सुपा-यांचे कोण कौतुक !

वाडयांमधून नारळी, पोफळीच्या बरोबरी काळी मिरी, नागवेलीची पानांचेही पीक घेतले जाते. तमालपत्राची झाडे, जायफळाच्या झाडापासून जायफळ आणि जायपत्रीचे उत्पादन घेतले जाते.
आंबापोळी, फणसपोळी, फळसगरे, कुळीथ पीठ, केळ्याचे पीठ सर्वांच्या आवडीचे.



पित्तशामक असणारे कोकमही इथलेच. झाडावरची लालचुटूक लक्ष वेधून घेतात. घराघरातून कोकम वाळवून आमसूले तयार केली जातात. कोकम सरबतही सर्वांच्या परिचयाचे आहेच.

वाळत घातलेली कोकमं


उरुंडीची फळे
ही उरुंडीची फळे. ह्या पासून तेल काढतात. हे तेल कडू आणि अतिशय महाग असते. ह्या तेलाचा उपयोग वाडयाच्या लाकडांना लावायला करतात. त्यामुळे त्याची चमक तर टिकतेच आणि वाळवीही लागत नाही

मात्र ह्या सर्वांवर कडी करतो कोकण राजा आंबा ! जागोजागी, रस्त्यावर, जंगलात कै-यांची झाडं. आंबा गावातून बाहेर जाण्याच्या तयारीत त्यामुळे माणसांची लगबग दिवसभर सुरु होती. थेट झाडावरुन उतरवून पेटीत भरुन घेण्याचा आमचा अनुभव अनोखा होता. पूर्णताहा कार्बाइड विरहीत आंब्याची चव पुढचे पंधरा दिवस चाखता आली.



तिथे खायला घेतलेले आंबेही चवीला अप्रतिम होतो. "आंबा पिकतो, रस गाळीतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो" लहानपणच्या गाण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेता आला.
स्थानिक पिकवलेले - साधे आणि चविष्ट जेवण

न्याहारीसाठी भाजणीची नव्हे तांदूळाची थालिपीटं
कोकण सहलीतला सर्वात लक्षात राहणारा अनुभव म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती. पिकते तेच ग्राहकांना वाढायचे त्यामुळे जेवण साधे मात्र अतिशय रुचकर. उकडीचे मोदक, तांदळाची भाकरी, फणसाची भाजी, केळफूलाची भाजी, आमरस सोलकढी, घावन, थालिपीट, पोहे.... अहो तुमची ब्रम्हानंदी टाळी न लागली तरच नवल ! मांसाहारी लोकांसाठी तर इथे खूपच चंगळ. मात्र जाणकार नसल्याने शाकाहारी माणसाने त्यावर भाष्य करु नये हेच योग्य !

छायाचित्र - अनुराग केंगे

Wednesday, November 9, 2016

समुद्र-चिकू आणि धनसाक अर्थात बोर्डी-डहाणू-उदवाडा

हवेतल्या सुखद गारव्यामुळे दिवाळीनंतरचा छोटा ब्रेक नवचैतन्याचा असतो. दिवाळीच्या फराळाची चव अजूनही जीभेवर रेंगाळत असतांना आम्ही त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्गे बोर्डीकडे निघालो. हा रस्ता काही ठिकाणी खराब असला तरी इथला निसर्ग मात्र अप्रतिम आहे. दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडी, हिरवेगार डोंगर, भाताची शेती आणि शेतात काम करणारे अदिवासी... तुम्ही तुमच्या रोजच्या जगण्यातून अलगद बाहेर पडता. साहजिकच मोकळ्या माळरानावर घरुन करुन नेलेली न्याहारी अधिकच चवदार लागली ह्यात नवल नाही.
कांचन वृक्षाचे फूल

बोर्डीतले रिसॉर्ट निसर्गसंपन्न असल्याने वृक्ष-फुलांची रेलचेल होती. कौतुकाची गोष्ट ही की विदेशी झाडे किंवा ’ऑर्नमेंटल’ झाडे फारशी लावली नव्हती. त्यामुळे पक्षी आणि किटकही मुबलक होते.

इथे मुख्यता चिकूच्या वाडया आहेत. वडिलोपार्जित वाडयांमध्ये चिकूच्या झाडाचे वयोमान अवघे ७० ते १०० वर्षे आहे. झाडे उंच वाढली असून त्यांची खोडेही जाड आहेत. मात्र अजूनही ही झाडे वर्षातून तीनवेळा बहरतात. त्यामुळे बाराही महिने उत्पादन असते.

चिकूची वाडी

चिकू धुवायचा पाळणा
चिकू जेव्हा उतरवला जातो तेव्हा तेव्हा त्यावर चीक आणि धूळ असते. चिकू धुवायचा पाळणा पाहून तिथल्या लोकांचे कौतुक वाटले. त्यामुळे चिकूचा चीक आणि धूळ निघून जाऊन फिक्कट मातकट रंगाचा चिकू आपल्यापर्यंत पोहोचतो. इतर ठिकाणचा चिकू हा अधिक गडद चॉकलेटी रंगाचा, आकाराने छोटा आणि कमी गोड असतो. त्याच्या तुलनेत डहाणू-घोलवड-बोर्डीचे चिकू हे आकाराने खूप मोठे, अतिशय गोड आणि फिक्क्या रंगाचे असतात.


मुबलक आणि नाशवंत फळ असल्याने चिकूचे काप करुन, उन्हात वाळवून त्याच्या फोडी किंवा पावडर साठवता येते. ह्याचा वापर लोणचे, कुल्फी, मिल्कशेक, आईसक्रीममध्ये करतात. त्यामुळे त्याला सतत मागणी असते.

पपनस

पॅशन फ्रुट

चिकूच्या बरोबरीने पपनस, अननस, स्टार फ्रुट (कमरख), रोज अ‍ॅपल (लाल जाम), पॅशन फ्रुट आणि नारळ ह्यांची लागवड केली जाते. गज-यात किंवा वेणीत वापरली जाणारी झिपरीची झाडेही इथे मुबलक लावली आहेत, ही झाडे मालकाला चांगले उतपन्न देतात.

वृंदावन स्टुडियो
बोर्डीजवळचे, गुजरात सीमेवर असलेले उंबरगाव येथील वृंदावन स्टुडियो प्रसिध्द आहे. अनेक पौराणिक मालिकांचे चित्रिकरण येथे चालते. आपल्याला तेथे जाऊन पाहताही येते.

तेथूनच पुढे उदवाडा हे पारशी लोकांची वस्ती असणारे छोटेसे गाव. नरेंद्र मोदींजींनी उदवाडयाला ’हेरीटेज टाऊन’ म्हणून घोषित केले आहे.

पारश्यांनी जेव्हा इराणहून स्थलांतर केले तेव्हा त्यांनी उदवाडा आणि नवसारी येथे आपले बस्तान बसवले. संख्येने कमी असणारे पारशी भारतीयांमध्ये मिसळले आणि इथलेच होऊन गेले. गांधीजी दादाभाई नौरोजींना आपले गुरु मानत. मादाम कामा, फिरोझशहा मेहता, फिरोझ गांधी ही त्यातली काही ठळक नावं. देशाच्या प्रगतीतही त्यांचे मोठे योगदान आहे. टाटा उद्योग समूह हे त्यातील प्रमुख नाव. पारश्याचे रीतीरिवाजही आपल्या संस्कृतीशी जवळीक साधणारे आहेत.

आपल्यासारखाच त्यांच्याकडेही शुभशकुनासाठी  कुमकुम, अक्षता, खारीक-खडीसाखरेचा वापर होतो.
पारशी पेहराव, भांडी आणि औक्षण साहित्य
यज्ञहोमासारखाच त्यांच्याकडे अग्नीला पवित्र मानतात. इतके की अग्यारीत हा अग्नी सतत पेटलेला असतो मात्र पारश्यांखेरीज येथे अन्य कुणाला प्रवेश नाही. पारश्यांची ही संस्कृती, इतिहास आणि व्यक्तीमत्वांची माहिती आपल्या उदवाडयाच्या पारसी संग्रहालयात पहायला मिळते.

पारशी अग्यारी
उदवाडयात फिरतांना गल्लीबोळातून असलेली पारश्यांची स्वच्छ, नेटकी आणि अंगणात झोका असलेली घरे आपले लक्ष वेधून घेतात. जवळच्या देहेरी गावच्या रस्त्यावरही पारश्यांची अनेक अप्रतिम घरे बघायला मिळतात.
                                                                                  पारंपारीक पारशी घर                        
पारशी खाद्यसंस्कृती हा स्वतंत्र विषय आहे. मुख्यता मासांहार बरोबरच त्यांचे शाकाहारी पदार्थही प्रसिध्द आहेत. जवळच असलेल्या पारसी-दा-धाबा ह्या धाब्यावर एकच पदार्थ शाकाहार आणि
मांसाहार प्रकारात मिळण्याची आहे. त्यामुळे आम्हालाही पारसी शाकाहारी धनसाक आणि पनीर सल्लीचा आनंद घेता आला.
पारसी शाकाहारी धनसाक

प्रसिध्द पारसी डेअरी कुल्फी
जेवणानंतर पारसी डेअरी कुल्फीचा आनंद अवर्णनीय. गोल आकाराच्या कुल्फीचे केलेले चौकोनी तुकडे आपण तोंडात टाकतो तेव्हा स्वाद आणि दर्जा ह्याचा सुंदर मिलाफ अनुभवतो. खवय्यांनी डहाणूच्या पारशी बेकरीलाही भेट आवर्जून द्यावी.

थोडक्यात काय तर, गावाच्या बाहेर थोडे रहायला गेलातर डहाणू-बोर्डीचा समुद्रकिना-याने जाणारा रस्ता आणि हिरवाईने नटलेला निसर्ग मन उल्हसित करतात हे नक्की .

छायाचित्र - मृण्मयी केंगे व अनुराग केंगे

Tuesday, October 4, 2016

भाताचे वडे

Rice Wada
संध्याकाळच्या खाण्यासाठी मुलांना चमचमीत (आणि मला मात्र त्यांनी पौष्टीकच खावं असे वाटत रहाते !) हवे असते. दिवसभराच्या शाळा-कॉलेजच्या धावपळीनंतर खरंतर पॉवर पॅक्ड स्नॅक्सची गरज असतेच. अश्या वेळेला पटकन होणारे चमचमीत आणि पौष्टीक भाताचे वडे मुलांना खुश करतात.








साहित्य  

१ वाटी शिजवलेला भात (उरलेला असेल तर उत्तम)
१ टे. स्पून डाळीचे पीठ
१ टे. स्पून तांदळाचे पीठ
१ कांदा चिरुन
१/२ वाटी मक्याचे दाणे/मटार/गाजराचे तुकडे (जे असेल ते)
आलं, लसूण, मिरची पेस्ट
कोथिंबीर

कृती



१. शिजलेला थंड भात हाताने चांगला कुस्करुन घ्या.
२. त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले गाजराचे तुकडे, वाफवलेले मटार, मक्याचे दाणे आणि कोथिंबीर घाला.
३. आलं, लसूण, मिरची पेस्ट, मीठ घालून कालवा.
४. आता मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी डाळीचे व तांदळाचे पीठ घाला. पाणी वापरायची गरज नाही
५. कढईत तेल तापत ठेवा
६. तेल तापले की हाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून खुसखुशीत तळून घ्या.
७. हिरवी चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.

फोटो सहकार्य - मृण्मयी

Wednesday, August 31, 2016

मनी गणेश वसावा

गेल्या आठ वर्षांपासून मी घरी शाडू मातीचा गणपती तयार करते आहे. कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता दरवर्षी चुकतमाकत हे शिकणे सुरुच आहे. पहिल्या वर्षी गणपती तयार करायला घेतला तेव्हा पर्यावरणाच्या हिताचाच विचार मनात होता. दोन्ही मुलांनाही त्यात सहभागी केले त्यामुळे प्रत्येक वर्षी गणेशमूर्ती तयार करणे हा आम्हा सर्वांसाठी सृजनात्मक अनुभव झाला. आईच संपूर्ण जवाबदारी घेते आहे म्हटल्यावर मुलांनी त्यांना इतर ’अधिक महत्त्वाची’ कामे आहेत असे सांगून अंग काढून घेतले. त्यामुळे आता प्रत्येक वर्षी गणरायाला घडवणे माझ्याकडे आले.

प्रत्येक वर्षी माती भिजवतांना माझ्या मनात उत्साहाबरोबरच धाकधूक असते. मातीला प्रथम वंदन करुनच भिजवायला घेते. अनेकांनी मला प्रश्न विचारलेत की तू एखादे चित्र किंवा मूर्ती समोर ठेवतेस का ? सुरुवात कशी करतेस ? किती किलो माती लागते ? मूर्ती किती मोठी असावी हे कसे ठरवतेस ? दागिने, आसन वगैरे आधीच ठरवून ठेवतेस का ?... वगैरे वगैरे. आता खरंतर हे प्रश्न एखाद्या वाकबगार कलाकाराला किंवा मूर्तीकाराला विचारणे आणि त्याने उत्तर देणे ठिक आहे. मात्र माझ्या सारख्या हौशी कलाकाराला (?) हे विचारल्यावर माझे उत्तर असते, " मी काही ठरवून करत नाही" .

हो अगदी खरे आहे. स्त्रीला सृजनशील म्हटले आहे ते उगीच नाही. छोटा अंकूर जेव्हा स्त्रीच्या उदरात फुलतो तेव्हा तिला तरी त्याचे रंग-रुप कोठे माहित असते. नऊ महिने त्याची हालचाल जाणवते मात्र त्याचे रुप काही केल्या डोळयासमोर येत नाही. अगदी श्रीकृष्णाचा, बाबाचा, आजी-आजोबांचा चेहरा समोर आणला तरीही नाही. तिच्या पोटात वाढणारा तो एकमेव आणि अद्वितीय असतो/असते.


दरवर्षी भाद्रपद जवळ आला की मी माती कालवून ठेवते मात्र मनापासून करावेसे वाटत नाही तोपर्यंत गणपती तयार करायला घेत नाही. माती सारखी करतांना हळूहळू त्याचे रुप मनात साकारत जाते.

मातीचे गोळे एकमेकांवर ठेवल्यावर, त्यातून मूर्ती घडवतांना human anatomy डोळ्यासमोर येते, मात्र कलाकार म्हणून आपली मर्यादा जाणवत रहाते. मग सुरु होते तगमग ! कसे असायला हवे हे माहिती आहे मात्र साकारता येत नाही. बिघडण्या-घडण्याच्या ह्या अस्वस्थतेत आपल्या गणेश बाळाचे रुप साजिरे व्हावे ह्यासाठी ही धडपड असते. आता माझ्यातल्या कलाकारापेक्षा आई अधिक वरचढ झालेली असते. मला वाटते प्रत्येक कलाकार पालकत्वाच्या भूमिकेत नकळत असाच शिरत असावा. मूर्ती पूर्ण झाल्यावर, ’काही राहिले आहे का’ असे विचारल्यावर खरंतर कुणी काही चुका सांगाव्या असे अजिबात वाटत नसते. कारण शेवटी, आपले मूल जसे आहे तसेच आईला आवडते. मला ह्यावेळी हटकून पार्वतीची गोष्ट आठवते. तिनेही गणरायाला असेच आपल्या मळापासून घडवले आणि हत्तीचे तोंड बसवावे लागल्यावर मनापासून कवटाळले. असो, तर दरवर्षी ही भावना माझ्या मनात उचंबळून येते.




आता मूर्ती तयार झाली आहे. रंगवल्यावर माझ्या ह्या श्री गणेशाचे रुप आपल्या समोर येईलच. त्याबद्दल प्रतिक्रियाही येतील. मात्र मला सृजनाचा आनंद देणारा हा गणेश माझ्या मनी वसला आहे.



गणपती बाप्पा मोरया !!

Saturday, April 9, 2016

फ्रुटखंड

चैत्राच्या पालवीसह नाविन्याची आस घेऊन येणारा गुढीपाडव्याचा नववर्ष सण ! एव्हाना थंडी संपून ऊन चांगलेच तापायला लागलेले असते. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्यातही साहजिकच बदल होतात. नुकतीच होळीला खाल्लेली पुरणपोळी लगेचच येणा-या गुढीपाडव्याला नको असते. तेव्हा आवर्जून हवे असते केशर-वेलची घातलेले थंडगार श्रीखंड ! श्रीखंडाचा उल्लेख महाभारतात आढळतो. असे म्हणतात भीमाने हा पदार्थ सर्वात प्रथम केला होता. आयुर्वेदातही श्रीखंड तयार करण्याच्या कृतीला महत्त्व आहे. आजकाल बाजारात दूध पावडर टाकून, कृत्रिम रंग घालून तयार केलेल्या फ्लेवर्ड श्रीखंडाला फारशी चवही नाही आणि आरोग्यासाठी चांगलेही नाही. असो. दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी मी गुढीपाडव्या पारंपारिक स्वयंपाक केला होता. श्रीखंडही होतेच. मात्र ह्यावेळेला काहीतरी नवीन व्टिस्ट द्यावा ह्या हेतूने फ्रुटखंड केले. मुलांना अर्थातच फ्रुटकर्स्टड्चे हे पारंपारिक आणि आरोग्यपूर्ण रुप खूपच आवडले.

साहित्य :

१/२ कि. तयार अथवा घरी केलेले श्रीखंड
१/२ वाटी दूध
१/२ वाटी सुकामेवा (आवडत असल्यास)
विविध फळं - केळ, चिकू, डाळिंब, द्राक्ष, खरबुज

तयारी

१. डाळिंबाचे दाणे खूप आंबट नाही ह्याची खात्री करुन सोलून घ्यावे.
२. द्राक्षे धुवून, आंबट नाही ह्याची खात्री करुन, एका द्राक्षाचे दोन भाग करावे.
३. खरबुजाचे साल सोलून छोटे काप करुन घ्यावे
४. चिकूची साले काढून छोटे काप करावे
५. शेवटी केळ्याचे छोटे काप करावे.

कृती

सर्व कापलेली फळे श्रीखंडात ताबडतोब घालून सर्व श्रीखंड नीट हलवून घ्यावे. श्रीखंड खूप घट्ट असल्यास
२ चमचे दूध घालावे. मात्र जास्त नको कारण फळांचा रस सुटून श्रीखंड पातळ होतेच. श्रीखंड गार करायला ठेवा. पारंपारीक जेवणातला हा बदल सगळ्यांनाच आवडेल.



काहीजण ह्याच्यातच काजू, पिस्ते, चारोळ्या वगैरे सुकामेका घालतात. मात्र फळांची चव कमी होते म्हणून मी सुकामेवा घालत नाही.

टीप : थ्री कोर्स मेन्यूमध्ये फ्रुटखंड हे डेर्सट म्हणूनही सर्व्ह करु शकता.

Wednesday, March 23, 2016

खुल के जियो

रविवारच्या निवांत सकाळी, दूरदर्शनची रंगोली पाहतांना होळीच्या जाहिरातीने  (#KhulKeKheloHoli)मन वेधून घेतले. एका वृध्दाश्रमात, सगळी वयस्कर मंडळी गप्पांमध्ये रंगलेली असतात. मात्र एक आजोबा वृध्दाश्रमात चालेली रंगांची तयारी पाहून हरकून जातात. जरा इकडे तिकडे जाऊन वेध घेतात आणि विविध रंग त्यांच्या नजरेस पडतात. मग काय, त्यांच्यातले लहान मूल जागे होते. हळूच रंग चोरुन खिशात टाकतात. वृध्दाश्रमातली त्यांची मैत्रिण मात्र हे सगळं पहात असते. आजोबा आता मित्रांना रंग लावायची संधीच शोधत असतात. तेव्हाच तरुण मुल-मुली सगळ्यांना भेटायला येतात. सगळ्यांना सावरत, जपत, टिळा लावत, मिठाई भरवत, शुभेच्छा देत, 'होळी' साजरी करतात. आजोबांना मात्र अशी जपून-सावरुन साजरी केलेली फॉर्मल होळी अजिबात आवडत नाही. त्यांच्या चेह-यावर निराशा स्पष्ट दिसते. इतक्यात त्यांची मैत्रिण येते आणि ध्यानीमनी नसतांना संपूर्ण चेह-यावर रंग फासते. आजोबा आणि जमलेले सगळेच आश्चर्यचकित होतात आणि मैत्रिण खट्याळपणे म्हणते , " एक चुटकीसे क्या होगा ? खूल के खेलो होली ! "


होळीच्या विविध रंगांसारखीच ही जाहिरात जीवनाचा विविध प्रकारे विचार करायला लावते. रोजच्या आयुष्याच आपलं जगणंही असंच सावरत, मोजून-मापून. आपल्यात दडलेल्या मुलाला अनेक गोष्टी करुन बघायच्या असतात. शेजारच्या बागेतली फुलं चोरायची असतात, फळं तोडायची असतात, मोठ्याने ओरडून गाणं म्हणायचं असतं, ऑफिसमध्ये खदखदून हसायचंही असत. पण आपण मात्र "सॉरी, एक्सक्यूज मी, इट्स ओके....", अश्या ब-याच फॉर्मॅलिटिजमध्ये अडकून पडतो. वेळोवेळी ह्या मुलाला दटावतो, गप्प करतो आणि मोकळेपणाने जगायचे नाकारतो.

होळीच्या निमित्ताने मिळालेला हा ’खुल के जियो’ चा संदेश लक्षात ठेऊन मोकळेपणाने जगायला काय हरकत आहे ? तुम्हाला काय वाटते ?



LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...