कोकणात दोन-चार वेळा जाणे झाले होते तरी खास आंब्याचा मोसम अनुभवला नव्हता. मग रत्नागिरी हापूस चाखण्यासाठी त्याच जिल्ह्यातली केळशी, वेळास आणि आंजर्ले ही ठिकाणे निश्चित केली. कोकणात निसर्ग आणि त्याला धरुन तेथील माणसांचे साधे जीवन ह्याचा आपल्याला पावलोपावली अनुभव येतो. रस्त्याने प्रवास करतांना वैशाख वणवा जाणवत होता तरी गुलमोहोरांचे फुललेले ताटवे डोळ्यांना सुखद गारवा देत होते. जागोजागी फुललेली कुडाची पांढरी फुले आणि त्यांचा मंद असा गोडसर वास. तोडल्यावर मात्र हाताला चीक लागत होता.
वाटेत माणगांवात वडघर नावाचे छोटे गाव लागते. साधारण २ किमी कच्च्या रस्त्याने आत गेल्या साने गुरुजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. अतिशय सुरेख बांधलेली ही वास्तू तर आहेच त्याच बरोबर साने गुरुजींचे जीवनचरित्र उलगडून दाखवले आहे. ’श्यामची आई’ वाले साने गुरुजी किती ’मोठे’ होते हे मुलांना नक्कीच दाखवण्यासारखे आहे.
|
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक |
|
साने गुरुजींचे हस्ताक्षर |
|
प्रिय जन्मभूमी |
कोकणाता शिरतांना सावित्री नदी आपले स्वागत करते. अतिशय विस्तीर्ण पात्र आणि स्वच्छ पाणी. सध्या पाणी टंचाई हे क्षणभर विसरायलाच झाले
|
सावित्रीनदीचे विस्तीर्ण पात्र |
निसर्गाने कोकणाला फळफळावळ अगदी उदार हस्ते बहाल केली आहे. उन्हाची तहान तहान होत असतांना करवंदांची जाळी आपले लक्ष वेधून घेतात. काळी टपोरी रसरशीत करवंदे तोडण्याचा मोह न झाला तरच नवल. ही रानमैना तोडतांना हातांना खरचटले तरी पर्वा नाही ! कॅलशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन अ नी युक्त असं हे छोटंस फळ रक्तक्षयातही उपयुक्त आहे. आणि हो माझ्या शहरी मनाने केलीली आणखीन एक नोंद म्हणजे रस्त्यावरची ही करवंद पूर्णत: सेंद्रीय आहेत. त्यामुळे आम्ही मनसोक्त ताव मारला !
रस्त्याच्या कडेकडेने दिसणारे काजूचे फळ ही पण निसर्गाचीच देणगी. पेरच्या आकाराचे (पेर बरोबर तुलना केली कारण शहरात हे फळ जास्त परिचयाचे आहे) आणि त्याला चिकटलेली काजूची बी. दिसायला खूप लोभसवाणे. ही झाडे मात्र जंगलात आणि रस्त्याच्या कडेनेच आढळतात. मात्र इथे काजू उद्योगही कमी आढळले. मात्र ओल्या काजूची उसळ हा तिथला खास मेन्यू. आम्ही मात्र काजूफळ/गर चोखून खाल्ला. काही ठिकाणी ह्याचे सरबतही केले जाते.
नारळ, फणस आणि सुपारीविषयी काय सांगावे. संपूर्ण कोकणात वाडयामधून ह्याची लागवड केली जाते. कोकणी माणसाचे आर्थिक गणितच ह्यावर अवलंबून आहे. आपल्या सारख्यांना मात्र फणसाने भरलेले झाडं, नारळाच्या झावळ्या आणि पिवळ्या सुपा-यांचे कोण कौतुक !
वाडयांमधून नारळी, पोफळीच्या बरोबरी काळी मिरी, नागवेलीची पानांचेही पीक घेतले जाते. तमालपत्राची झाडे, जायफळाच्या झाडापासून जायफळ आणि जायपत्रीचे उत्पादन घेतले जाते.
आंबापोळी, फणसपोळी, फळसगरे, कुळीथ पीठ, केळ्याचे पीठ सर्वांच्या आवडीचे.
पित्तशामक असणारे कोकमही इथलेच. झाडावरची लालचुटूक लक्ष वेधून घेतात. घराघरातून कोकम वाळवून आमसूले तयार केली जातात. कोकम सरबतही सर्वांच्या परिचयाचे आहेच.
|
वाळत घातलेली कोकमं |
|
उरुंडीची फळे |
ही उरुंडीची फळे. ह्या पासून तेल काढतात. हे तेल कडू आणि अतिशय महाग असते. ह्या तेलाचा उपयोग वाडयाच्या लाकडांना लावायला करतात. त्यामुळे त्याची चमक तर टिकतेच आणि वाळवीही लागत नाही
मात्र ह्या सर्वांवर कडी करतो कोकण राजा आंबा ! जागोजागी, रस्त्यावर, जंगलात कै-यांची झाडं. आंबा गावातून बाहेर जाण्याच्या तयारीत त्यामुळे माणसांची लगबग दिवसभर सुरु होती. थेट झाडावरुन उतरवून पेटीत भरुन घेण्याचा आमचा अनुभव अनोखा होता. पूर्णताहा कार्बाइड विरहीत आंब्याची चव पुढचे पंधरा दिवस चाखता आली.
तिथे खायला घेतलेले आंबेही चवीला अप्रतिम होतो. "आंबा पिकतो, रस गाळीतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो" लहानपणच्या गाण्याचा अनुभव प्रत्यक्ष घेता आला.
|
स्थानिक पिकवलेले - साधे आणि चविष्ट जेवण |
|
न्याहारीसाठी भाजणीची नव्हे तांदूळाची थालिपीटं |
कोकण सहलीतला सर्वात लक्षात राहणारा अनुभव म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती. पिकते तेच ग्राहकांना वाढायचे त्यामुळे जेवण साधे मात्र अतिशय रुचकर. उकडीचे मोदक, तांदळाची भाकरी, फणसाची भाजी, केळफूलाची भाजी, आमरस सोलकढी, घावन, थालिपीट, पोहे.... अहो तुमची ब्रम्हानंदी टाळी न लागली तरच नवल ! मांसाहारी लोकांसाठी तर इथे खूपच चंगळ. मात्र जाणकार नसल्याने शाकाहारी माणसाने त्यावर भाष्य करु नये हेच योग्य !
छायाचित्र - अनुराग केंगे
No comments:
Post a Comment