फेसबुक स्टेट्स अपडेट्स, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन मनी ट्रान्सफर, अमेरिकेतल्या मुलाशी स्काईप... ही आणि अशी अनेक वाक्य आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेली आहेत. खरंतर हा बदल तसा अलिकडचा, मात्र झपाटयाने झालेला. संगणक, इंटरनेट आणि आता स्मार्ट मोबाईल फोन्समुळे ही क्रांती शक्य झाली आहे. नवीन तंत्रज्ञानाचे स्वागत नवीन पिढी लगेच करतेच मात्र त्याची उपयुक्तता लक्षात आलेली मागची पिढीही (साधारण ६०-७० वयोमानाची) ऑनलाईन बॅंकींग, सोशल संकेतस्थळ, व्हॉटसअॅप अतिशय आत्मविश्वासाने हाताळते आहे. ही ख-या अर्थाने तंत्रज्ञानाची क्रांती आहे.
भारतात इंटरनेटचा वापर साधारणपणे १९९४ साली सुरु झाला. त्याच दरम्यान आम्हीही आमच्या घरी (मुंबईत VSNL मध्ये अर्ज करुन) इंटरनेट कनेक्शन घेतले. त्यावेळेला 'एक्सटर्नल मॉडेम’ वापरात होता. नेटवरच्या वेबसाईट्सही फक्त माहिती किंवा चित्रांसह दिसायच्या. हे सगळे फोन वरुन डायलिंग असल्यामुळे बहुतेकवेळा बील आटोक्यात रहाण्यासाठी चित्र बंद ठेऊन माहितीच वाचली जायची, आणि हो, STD डायलिंग असल्यामुळे बहुतेक वेळा कामही रात्री ११ नंतर करणे फायद्याचे होते. अगदी निकड असेल तर आम्ही रविवारी मुंबईला फक्त नेट सर्फींगसाठी सुध्दा जायचो. त्याच वेळेला निश्चित केले होते की आता हेच आपले कार्यक्षेत्र असणार आहे. त्यादृष्टीने अभ्यास, माहिती गोळा करुन डिसेंबर १९९७ मध्ये आम्ही नाशिकची पहिली वेबसाईट www.nashik.com उभी केली. फेब्रुवारी २००० मध्ये मराठी दिनाच्या दिवशी भारतातली पहिली मराठी वेबसाईट www.marathiworld.com चालू केली. त्यावेळी ही घटना नाशिककरांसाठी नवीन आणि थोडीशी न समजण्याचीच होती पण परदेशात असलेले नाशिककर तसेच जगभरातील मराठी माणसांनी मात्र आमचे भरभरुन कौतूक केले.
अमेरीकेत इंटरनेटचा शोध आणि वापर १९८१ साली सुरु झाला. तेव्हा फक्त लष्करी सेवेसाठी उपलब्ध असलेली ही सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. १९९१ मध्ये World Wide Web सुरु झाल्यावर इंटरनेटची लोकप्रियता वाढायला लागली. ह्याचे मुख्य कारण होते की लोकांना रंगीत स्वरुपात विविध माहिती, छायाचित्रं आणि चलचित्रांसकट वाचता येत होती. त्यावेळी फक्त इंग्रजीत असणारी, अल्पसंखेत असणारी संकेतस्थळं आजच्या घडीला विविध भाषेत ८००,०००,००० पेक्षाही जास्त आहेत. मातृभाषेत माहितीची देवाणघेवाण उपलब्ध झाल्यामुळे अल्पशिक्षितही ह्या तंत्रज्ञानाचा लाभ घेतांना दिसतात. माहिती व्यतिरिक्त इतरही सेवा देण्यात याव्या ह्या उद्देशाने १९९५ साली Amazon.com ही वस्तू खरेदी-विक्रीची वेबसाईट अमेरिकेत सुरु झाली. तेव्हा क्रेडीट-डेबिट कार्ड पध्दत आपल्याकडे नसल्याने भारतात त्याची फारशी लोकप्रियता नव्हती. १९९६ साली भारतीय तरुण सबीर भाटियाने इंटरनेटवर Hotmail ही मोफत इमेल सेवा सुरु केली. काही क्षणात जगाच्या कानाकोप-यात, अत्यंत कमी किंमतीत, संपर्क साधता येणारी ही इ-मेल सेवा मायक्रोसॉफ्ट कंपनीने ’काहीशे’ कोटी डॉलर्सना विकत घेतली. एका भारतीयाच्या ह्या तांत्रिक क्रांतीमुळे तरुणांना अमेरिकेत सॉफ्टवेअर्सच्या संधी उपलब्ध झाल्या. अनेक मोठ्या कंपन्याही आपले बस्तान भारतात बसवू पाहात होत्या.
त्याचवेळेला १९९८ साली गुगलने आपले सर्च इंजिन आणले. फक्त इंग्रजीत आपली सेवा देणारे हे सर्च इंजिन अल्पावधितच प्रत्येक भाषेमध्ये सेवा देऊ लागले आणि इंटरनेटवरच्या महाकाय माहितीपर्यंत एका चुकटीसरशी पोहोचणे शक्य झाले. त्यामुळे गुगल अर्थातच इतके लोकप्रिय झाले की, आज एखादी माहिती शोधायची असल्यास ” अहो, गुगल करा नां !” असा शब्द प्रयोग वापरात आला. गुगलमुळे इंटरनेटवरचे बिझिनेस मॉडेल बदलले. गुगल अॅनालिटिक्स आणि गुगल अॅडसेन्सद्वारे इंटरनेटवर जाहिरातींच्या सहाय्याने पैसे कमावता येऊ लागले. त्यामुळे संकेतस्थळांच्या बरोबरीने ब्लॉग्सचा जन्म झाला.
२००४ साली हे तंत्रज्ञानाचे वारे इतके सैराट सुटले कारण एव्हाना फेसबुकचा जन्म झालेला होता. सुरुवातीला साधारण वाटणारे हे बाळ आता चांगलेच तरुण झाले आहे. लोकप्रियता तर इतकी आहे की एकवेळ तुमचे आधारकार्ड नसेल मात्र फेसबुक अकाऊंट हवं असं तरुणाईचं मत आहे. आपलं हे ऑनलाईन रुप बहुतेकजण साजिरं ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. तुमच्या व्यवसायाचे संकेतस्थळ असले तरीही त्या कंपनीचे फेसबुक पेज असणे अत्यंत आवश्यक आहे. फेसबुक वापरायला इतकं सोप्प की कंपनीच्या वॉचमनपासून बॉसपर्यंत सगळेच ’फ्रेन्ड’ यादीत मोडतात. फेसबुकचे हात धरुन पाठोपाठ गुगल प्लस, व्टिटर, युट्यूब, लिंक्ड इन, पीइंटरेस्ट, पिकासा, इन्स्टाग्राम अवतरले. ही सगळी संकेतस्थळं खास सोशलानेटवर्कींटसाठीच आहेत मात्र प्रत्येकाचा आशय आणि उद्देश वेगवेगळा. त्यामुळे आजच्या घडीला तुम्ही ह्यांचे सभासद नसाल तर तुमचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
सोशल नेटवर्कींगच्या बरोबरीने संकेतस्थळांच्या तंत्रज्ञानातही खूप प्रगती झाली. पूर्वी फक्त माहितीसाठी मर्यादीत असलेली संकेतस्थळ आता सॉफ्टवेअरच्या बरोबरीने काम करतात. त्यामुळेच तर तुम्ही ऑनलाईन बॅंकीग, ऑनलाईन रेल्वे आरक्षण, ऑनलाईन खरेदी-विक्री, ऑनलाईन पासपोर्ट, आधारकार्ड, सातबारा अश्या आणि इतर जीवनाशी निगडीत गोष्टी ह्या संकेतस्थळांवर करु शकता. तंत्रज्ञानाने अजून एक पाऊल पुढे टाकत ह्या सर्व गोष्टी ’अॅप’ द्वारा आपल्या स्मार्ट फोनवर उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्मार्ट फोनवर कमी किंमतीत संपर्काची क्रांती केली व्हॉटअॅपने. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटअॅपची ताकद फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गने ओळखली आणि चक्क १९ बिलियन डॉलर्सला ही कंपनी विकत घेतली. सातत्याने नवीन फीचर्स आणणा-या ह्या तंत्राचे रोज १ मिलियन नवीन सभासद येतात. नुकत्याच आलेल्या ’आभासी तंत्रज्ञानाने’ विकसित केलेल्या ’पोकेमान गो’ ह्या खेळाने जगाला वेड लावले आहे. ह्या तंत्रात संगणकाने तयार केलेल्या प्रतिमा वास्तव जगात उमटवल्या जातात.
इंटरनेटच्या ह्या सेवा तुम्ही विनासायास घेऊ शकता जेव्हा तुमच्याकडे उत्तम वेगाचे इंटरनेट असेल आणि संगणक किंवा फोन अद्यावत असेल तर. दर काही महिन्यांने नवीन येणारे संगणक किंवा फोनचे तंत्रज्ञान आपण वाचत असतोच. मोठे स्क्रीन्स, जास्त वेगाच्या प्रोसेसर चिप्स आता बाजारात आहेत. आता USB तर 256 GB इतक्या क्षमतेतही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे VSNL ते JIO हा इंटरनेट वेगाचा प्रवासही थक्क करणारा. पूर्वी अर्ज करुन प्रतिक्षे नंतर मिळणारे इंटरनेट कनेक्शन आज मात्र ब्रॉड बॅण्डचा रुपात जवळच्या टेलिफोन ऑफिसमधून विकत घेता येते. जोडणी नंतर केबलच्या सहाय्याने आपल्या संगणकावर इंटरनेट अवतरते. टेलिफोन लाईन आपल्या घरात नको असल्यास 2G/3G/4G मोबाईल फोन नेटवर्क द्वारे इंटरनेट मिळू शकते. तुमच्या इंटरनेट्ची क्वालिटी किंवा मोबाईल ब्रॉडबॅण्ड सिग्नल हा तुमच्या 3G/4G मोबाईलच्या सिग्नलवर अवलंबून असतो. आजच्या काळात हे तंत्रज्ञान खूपच चलती असणारे आहे. फायबर ऑप्टीक्स हे ब्रॉड बॅण्डचे आणखी एक अतिशय नवीन असे तंत्र. परंतु त्यांची सेवा थोडी मर्यादीत व महाग आहे कारण ब-याचश्या कंपन्यांचे केबल किंवा वायर टाकण्याचे काम चालू आहे. नुकत्याच आलेल्या JIO ने तर क्रांतीच केली आहे. Voice over Long Term Evolution (VoLTE) चे तंत्र वापरुन जियोने बोलण्याचे तंत्र सुस्पष्ट तर केलेच पण त्याच बरोबर voice आणि data एकाच वेळेला अतिशय चांगल्या वेगाने वापरायची सोय ग्राहकांना दिली. अतिशय कमी दरात ही सेवा देत असल्याने कमी कालावधीत जियोचे लाखो ग्राहक आहेत.
तंत्रज्ञानाने कमी कालावधीत अनेक उपयुक्त गोष्टी आपल्यापुढे आणल्या. ज्या प्रगतीसाठी उपयुक्त आहेत. मात्र त्याचे दुष्परिणामही आहेत. आज तंत्रज्ञानाने पिढीचे अंतर कमी केले इतके की दर दहा वर्षात पिढी बदलते. आजच्या पिढीत नवीन जन्माला आलेल्या बाळाची ओळख कॅमेरा फोनशी आधी होते आणि मग वास्तव जगाशी. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. हा माहितीचा अल्लादिनचा राक्षस असल्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही सहजपणे ताबा मिळवू शकतो. त्यामुळेच तंत्रज्ञानाचा वापर करतांना तुम्हाला सातत्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सदर लेख महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रसिध्द झाला आहे